Ekburji Dam Illegal Water Lifting Pudhari
वाशिम

Washim News | एकबुर्जी धरण परिसरात अनधिकृत पाणी उपशावर मोठी कारवाई; विद्युत पंप जप्त

शेतात 6.40 ते 90 एच.पी. क्षमतेचा विद्युत पंप बसवून थेट धरणातून पाणी उपसा सुरू

पुढारी वृत्तसेवा

Ekburji Dam Illegal Water Lifting

वाशिम : शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर भूमिका घेत येथील एकबुर्जी धरण प्रकल्पाच्या शिवारात अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली. महसूल विभाग, पाटबंधारे विभाग, नगरपरिषद यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या धडक कारवाईत नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेला उच्च क्षमतेचा विद्युत पंप जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शेतकऱ्याने शेतासाठी विद्युत कनेक्शन मिळविण्यासाठी अर्ज सादर केला होता. मात्र, संबंधित अर्जास अधिकृत मंजुरी मिळालेली नसताना देखील शेतात 6.40 ते 90 एच.पी. क्षमतेचा विद्युत पंप बसवून थेट धरणातून पाणी उपसा सुरू ठेवण्यात आला होता. ही बाब गंभीर स्वरूपाची मानली जात असून, जलस्रोतांच्या अनधिकृत वापराचा हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आला होता.

दरम्यान, शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि वाढती पाण्याची मागणी लक्षात घेता, उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी धरणातील पाणी साठा पुरेशा प्रमाणात राखणे अत्यंत गरजेचे आहे. याच उद्देशाने प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांना वारंवार सूचना देत पाणी उपसा तात्काळ थांबविण्याचे तसेच कमी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, संबंधितांकडून या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले.

यामुळे प्रशासनाने कठोर पवित्रा घेत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, संबंधित विद्युत पंपाद्वारे पाणी उपसा सुरू असल्याचे स्पष्टपणे आढळून आले. त्यानंतर तत्काळ पंचनामा करून महसूल विभाग, विद्युत प्राधिकरणाचे तांत्रिक कर्मचारी आणि पोलिस विभागाच्या उपस्थितीत सदर पंप जप्त करण्यात आला. ही कारवाई संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून पार पाडण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रशासनाच्या या निर्णायक कारवाईमुळे एकबुर्जी धरणातील पाणी साठा संरक्षित ठेवण्यास मदत होणार असून, शहरातील नागरिकांना उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासू नये हा यामागील मुख्य उद्देश आहे. जलस्रोतांचे संवर्धन आणि योग्य व्यवस्थापन ही काळाची गरज असल्याचेही प्रशासनाने अधोरेखित केले आहे.

दरम्यान, अनधिकृत पाणी उपसा व वीज वापरामुळे केवळ सरकारी नियमांचे उल्लंघन होत नाही, तर इतर शेतकरी व नागरिकांवर अन्याय होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या नियमभंगाविरोधात भविष्यातही कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अनधिकृतरित्या पाणी उपसा करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने सर्व नागरिक व शेतकऱ्यांना नियमांचे पालन करण्याचे तसेच जलसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT