Illegal Water Extraction Washim
वाशिम : जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, जलसाठ्यांमधील पाण्याची उपलब्धताही घटली आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी आणि अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी जिल्हा परिषद वाशिमच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कठोर निर्देश जारी केले आहेत. ग्रामस्तरीय पाणीपुरवठा व स्वच्छता समित्या, जलसुरक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांना सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील जलाशय, धरणे, तलाव आणि बंधाऱ्यांमधून अनधिकृतपणे पाणी उपसा होत असल्याचे आढळल्यास संबंधित साहित्य जप्त करून सक्षम अधिकाऱ्यांना कळविण्यात येणार आहे. दोषींवर नियमानुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल. यासाठी ग्रामसेवक, तलाठी, पोलीस, महसूल आणि जलसंपदा विभागाने समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पाणीगळती रोखण्यावर भर
नळ पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी आणि कूपनलिकांच्या परिसरात पाणी उपलब्धतेवर परिणाम करणाऱ्या नवीन विहिरी खोदण्यास प्रतिबंध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक विहिरी, हातपंप आणि सामुदायिक जलस्रोतांमधून अवैध पाणी उपसा होणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच वितरण वाहिन्या, नळजोडण्या, व्हॉल्व्ह आणि जलकुंभांमधील गळती तातडीने दुरुस्त करावी. घरगुती नळजोडण्यांना तोट्या बसविणे बंधनकारक करण्यात आले असून, पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पूर्वनियोजन
उपलब्ध जलसाठ्यानुसार पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक निश्चित करून गावातील सर्व वाड्या-वस्त्यांना समान पाणी देण्याचे निर्देश आहेत. पाण्याचा वापर प्रामुख्याने पिण्यासाठी आणि घरगुती गरजांसाठी करावा. बागकाम, वाहने आणि रस्ते धुण्यासाठी पाणी वापरणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विहिरींच्या पाणीपातळीची नियमित पाहणी करून संभाव्य टंचाईसाठी पर्यायी जलस्रोतांचे नियोजन करण्यासही सांगण्यात आले आहे. तक्रारींची नोंद घेऊन कार्यवाहीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर करणे बंधनकारक आहे. या उपाययोजनांसाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवकांना सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी पाणी बचतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.