Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana Pudhari
वाशिम

Swadhar Yojana | स्वाधार योजनेच्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया संथ; कागदपत्रे अपलोड करताना अडथळे, तांत्रिक त्रुटी दूर करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana

वाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला तांत्रिक अडचणींचा फटका बसत असल्याने पात्र विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. संकेतस्थळ संथ गतीने सुरू राहणे, अर्ज भरताना प्रक्रिया मध्येच थांबणे तसेच कागदपत्रे अपलोड करताना वारंवार अडथळे येत असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

स्वाधार योजनेसाठी पात्र विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्जाची प्रक्रिया पूर्ण करता येत नसल्याचे चित्र आहे. अर्ज भरताना प्रक्रिया खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा सुरुवातीपासून प्रयत्न करावे लागत आहेत. त्यामुळे त्यांचा वेळ वाया जात असून मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागतो. मात्र, संकेतस्थळाच्या संथ गतीमुळे त्यांना अतिरिक्त वेळ तसेच आर्थिक खर्च करावा लागत आहे. तांत्रिक अडचणींमुळे अर्ज सादर करण्यास विलंब झाल्यास योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.

आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना महत्त्वाची आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज प्रणालीतील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करण्याची मागणी होत आहे. केवळ अर्जाची अंतिम मुदत वाढवून उपयोग होणार नसून संकेतस्थळाची कार्यक्षमता सुधारण्याची गरज असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

संबंधित विभागाने सर्व्हरची क्षमता वाढवावी, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करावी, तांत्रिक कारणांमुळे अर्ज सादर न करू शकलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त संधी द्यावी, तसेच मुदतवाढीबाबत स्पष्ट माहिती जाहीर करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी निगडित असलेल्या या योजनेचा लाभ पात्र विद्यार्थ्यांना वेळेत मिळावा, यासाठी प्रशासनाने तांत्रिक अडथळे दूर करून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.

तांत्रिक अडचणींची बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली आहे. या समस्येवर लवकरच ठोस उपाययोजना करण्यात येतील. तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी समाज कल्याण कार्यालय तत्पर आहे.
- पियुष चव्हाण, सहाय्य्क उपायुक्त, समाज कल्याण कार्यालय वाशीम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT