Janakrosh Morcha Washim Mahabodhi Vihar issue
वाशिम: बिहार येथील महाबोधी विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा, महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थान भारतीय बौद्ध महासभेला मिळावे आणि नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमी डॉ. भिमराव यशवंत आंबेडकर यांच्या अखत्यारीत द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज (दि.१८) जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्व भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भगत यांनी केले. मोर्चाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून हाती फलक व बॅनर घेऊन हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
या मोर्चात वाशिम जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून मोठ्या संख्येने बौद्ध बांधव, महिला-पुरुष कार्यकर्ते तसेच आंबेडकरी चळवळीतील असंख्य पदाधिकारी सहभागी झाले होते. प्रचंड गर्दीमुळे वाशिम शहरात ऐतिहासिक उत्साह व जनआक्रोशाचे वातावरण निर्माण झाले होते.
या मोर्चाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त करताना म्हटले की, “आम्ही काही पैसे मागत नाही, अन्न मागत नाही. आम्हाला आमची श्रद्धास्थाने हवीत. सर्व समुदायांचे धार्मिक स्थळे त्यांच्या ताब्यात असताना बौद्धांचे जागतिक तीर्थक्षेत्र महाबोधी विहार हिंदूंच्या ताब्यात आहे, हे अन्यायकारक असून आमच्या श्रद्धा-भावनांना ठेच पोहोचवणारे आहे. बुद्धगया मुक्तीसाठी सरकार टाळाटाळ करीत आहे, त्यामुळे आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत.”
मोर्चात जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भगत यांच्यासह देवानंद वाकोडे, प्रा. मुकुंद वानखेडे, हरिश्चंद्र पोफळे, संध्याताई पंडित, प्रमिला शेवाळे, अनिल तायडे, आकाश इंगळे, हर्षल इंगोले, अश्विन खिल्लारे, शालिग्राम पठाडे, गोपाल लबडे, प्रा. रंगनाथ धांडे, सोनाजी इंगळे, ज्योती इंगळे, डी. एस. कांबळे, नागोराव उचित, माधव हिवाळे, एन. यू. वानखेडे, प्रमोद बेलखेड, संजय सोनोने, प्रा. मुकुंद खडसे, संजय खाडे, रणपाल सावळे, वासुदेवराव भगत, धम्माल कांबळे, अभिमन्यू पंडित, माधव खडसे, संजय भगत, बाळू पोफळे, कैलाश इंगळे, विकास खिल्लारे, विनोद भगत, सूर्यकांत गायकवाड, स्वप्निल खडसे, सत्यप्रकाश भगत, विजय सोनुने आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हा मोर्चा डॉ. भिमराव यशवंत आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत एकाच दिवशी काढण्यात आला. बौद्ध समाजावरील अन्यायाविरोधात दाखवलेल्या आक्रोशामुळे प्रशासनासह जनतेचेही लक्ष वेधले गेले. कार्यक्रमाचे संचालन अनिल तायडे यांनी केले.