Washim Panchala Youth Murder
अजय ढवळे
वाशिम : शहरात खळबळ उडवून देणाऱ्या हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. मुरुमाच्या ढिगाऱ्यात तुकड्या-तुकड्यांत सापडलेल्या त्या मृतदेहाची ओळख पटली आहे. विठ्ठल कुंडलिक खडसे (वय ३२, मूळ रा. देवठाणा, सध्या रा. पंचाळा, जि. वाशिम) असे मृत तरुणाचे नाव आहे. या ओळखीनंतर आता पोलिसांच्या तपासाला मोठी गती आली असून, हत्येचे गूढ उकलण्याच्या मार्गावर आहे.
१७ मार्च रोजी रात्री मुरुमाच्या एका ढिगाऱ्यात कापलेले मानवी अवयव सापडल्याने संपूर्ण वाशिममध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी रात्रीच घटनास्थळ गाठून शोध सुरू केला. त्यानंतर १८ मार्च रोजी सकाळी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पुन्हा शोधमोहीम राबवली. यावेळी शेजारीच असलेल्या दुसऱ्या मुरुमाच्या ढिगाऱ्याखाली संपूर्ण शरीर आढळून आले.
मृतदेहाची अवस्था पाहता आरोपींनी अतिशय थंड डोक्याने आणि क्रूरपणे ही हत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुरुमाच्या ढिगाऱ्याचा वापर करण्यात आला होता. विठ्ठल याची हत्या नक्की कुठे झाली आणि मृतदेह या ठिकाणी कसा आणला, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वाशिमचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.विठ्ठल खडसे यांची हत्या कोणत्या कारणातून झाली, यादृष्टीने जुन्या वादांची पडताळणी सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे संशयितांचा माग काढला जात आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संशयितांच्या मुसक्या आवळण्याच्या तयारीत आहे. पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले असून, येत्या २४ तासांत या हत्याकांडाचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. मृताची ओळख पटली असून पुराव्यांची साखळी जोडली जात आहे. वाशिम शहर, ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांची संयुक्त पथके वेगवेगळ्या दिशांनी तपास करत आहेत. लवकरच या गुन्ह्याचा मास्टरमाईंड जेरबंद होईल.- अनुज तारे, पोलीस अधीक्षक, वाशिम