

Washim human body found
वाशिम: मुरुमाच्या ढिगाऱ्यात तुकड्या-तुकड्यांत सापडलेल्या मानवी अवयवांनंतर बुधवारी (दि. १८) दुपारी त्याच ठिकाणच्या दुसऱ्या ढिगाऱ्यात संपूर्ण मानवी शरीर आढळून आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. हे केवळ मृत्यू नसून अत्यंत क्रूरपणे केलेला नरसंहार असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
मंगळवारी (दि. १७) रात्री मुरुमाच्या एका ढिगाऱ्यात अचानक मानवी शरीराचे काही कापलेले अवयव स्थानिकांना दिसून आले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात भीतीचे सावट पसरले. वाशिम पोलिसांनी रात्रीच घटनास्थळ गाठून पंचनामा केला. बुधवारी सकाळी पोलिसांना संशय आल्याने पुन्हा मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवण्यात आली. यावेळी शेजारीच असलेल्या दुसऱ्या मुरुमाच्या ढिगाऱ्याला उपसले असता त्याखाली गाडलेले संपूर्ण मानवी शरीर बाहेर आले.
मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मुरुमाच्या ढिगाऱ्याचा वापर करण्यात आला होता. मृतदेहाची अवस्था पाहता, आरोपींनी अतिशय थंड डोक्याने आणि क्रूरपणे हे कृत्य केल्याचे दिसून येते. ही हत्या कुठे झाली आणि मृतदेह इथे आणून कसा टाकला, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी वाशिम पोलिसांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.वाशिम शहर व ग्रामीण पोलीस घटनास्थळावरील पुराव्यांची तपासणी करत आहेत. तर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) समांतर तपास करत असून संशयितांच्या मुसक्या आवळण्याच्या तयारीत आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तपासात काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. हा घातपात नेमका कोणत्या वादातून झाला? की यामागे काही जुने वैमनस्य आहे? या प्रश्नांची उत्तरे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे संपूर्ण वाशिम शहरात तणावपूर्ण वातावरण आहे.
आसपासच्या परिसरातील CCTV फुटेज आणि बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची पडताळणी सुरू आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. पुराव्यांची साखळी जोडली जात असून पोलिसांच्या संयुक्त पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. लवकरच या प्रकरणाचा मास्टरमाईंड जेरबंद होईल.
- अनुज तारे, जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम