अजय ढवळे
वाशिम : वर्ष २०१० मधील बहुचर्चित खून प्रकरणातील पसार आरोपी आशाबाई ऊर्फ आशा संतोष थोरात हिला वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने २५ जुलै २०२६ रोजी लोणावळा येथून अटक केली. गेली १५ वर्षे ती पोलिसांना गुंगारा देत होती. यापूर्वी तिचा अटकपूर्व जामीन अर्ज वाशिम अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता.
अशी घडली होती घटना
वाशिम शहर पोलीस ठाण्यात सन २०१० मध्ये अनिल सोपान मनोहर यांनी तक्रार दाखल केली होती. मृतक सुनील याने एका मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याच्या संशयातून आरोपींनी लाकडी दांडके, लोखंडी पाइप आणि चाकूने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. उपचारादरम्यान सुनीलचा मृत्यू झाल्याने या प्रकरणात भादंवि कलम ३०२, ३०७ आणि ३४ अन्वये वाढीव कलमे लावून गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणातील आरोपी आशाबाई सुरुवातीपासूनच पसार होती. जामीन अर्ज झाला होता फेटाळून आरोपीचे वकील यांनी आशाबाईचा गुन्ह्याशी संबंध नसल्याचा युक्तिवाद करत अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती. मात्र, सरकारी वकील एस. के. गिमेकर यांनी विरोध करत, आरोपी घटनेच्या दिवसापासून पसार असून हत्यारे जप्त करणे बाकी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
दोन्ही बाजू ऐकल्यानंतर तत्कालीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. रचना आर. तेहरा यांनी १८ सप्टेंबर २०१९ रोजी गुन्हा गंभीर असल्याचे स्पष्ट करत आरोपीची पोलीस कोठडीतील चौकशी आवश्यक मानून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. तेव्हापासून वाशिम पोलिस आरोपी महिलेचा शोध घेत होते. अखेर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे आणि अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेने प्रलंबित गुन्ह्यांतील पसार आरोपींची शोध मोहीम पुन्हा हाती घेतली.
दरम्यान, वाशिम शहर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात हवी असलेली आरोपी आशा थोरात लोणावळा येथे राहत असल्याची गोपनीय व तांत्रिक माहिती पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांना मिळाली. लगेच एलसीबीचे पथक लोणावळ्याला रवाना केले. तेथे सापळा रचून आशा थोरात हिला ताब्यात घेण्यात आले. तिला आता न्यायालयात हजर केले जाणार आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक निलेश जाधव, हवालदार विनोद अवगळे, महेश वानखेडे, अंमलदार विठ्ठल महाले, संदीप दुतोंडे, गोपाल चौधरी, महिला अंमलदार तेजस्विनी खोडके आणि चालक सुनील तायडे यांच्या पथकाने पार पाडली.