Washim Burglary Gang Arrested
वाशिम : जिल्ह्यात बंद घरांना लक्ष्य करून घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय ‘चड्डी-बनियान’ टोळीचा वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या टोळीतील आरोपींना ताब्यात घेत सात घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच, दोन गुन्ह्यांतील चोरीचा ४१ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि चांदीच्या दागिन्यांसह एकूण ६ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
बंद घरांना बनवायचे लक्ष्य
वाशिम जिल्ह्यात रात्रीच्या वेळी चड्डी-बनियान घालून, हातात धारदार शस्त्रे घेऊन फिरणारे तीन जण बंद घरांचे कुलूप तोडून घरातील सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरत असल्याच्या घटना घडत होत्या. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणांची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे निर्देश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपींच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीचा अभ्यास केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे बाबासाहेब कोल्हापुरे शिंदे (वय २७) आणि संजय मारुती शिंदे (वय ३५), दोघेही रा. विरेगाव, ता. जि. जालना, तसेच त्यांच्या आणखी एका साथीदाराची ओळख पटविण्यात आली.
मोबाईलचा वापर टाळल्याने तपासाचे आव्हान
आरोपी वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत होते. तसेच, ते मोबाईलचा वापरही करीत नसल्याने त्यांना शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेत आरोपींच्या गावाकडे येणाऱ्या-जाणाऱ्या मार्गांवर पाळत ठेवली. अखेर, १० ऑक्टोबर २०२६ रोजी पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींना ताब्यात घेतले.
त्यांची विश्वासात घेऊन चौकशी केली असता, जिल्ह्यातील तसेच परिसरातील विविध ठिकाणी केलेल्या घरफोड्यांची माहिती समोर आली.
सात घरफोडीचे गुन्हे उघड
या कारवाईत मालेगाव, रिसोड, अनसिंग, वाशिम शहर तसेच बुलढाणा जिल्ह्यातील चिखली आणि लोणार परिसरातील घरफोडीच्या घटनांचा उलगडा झाल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधित प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ), ३३१ (४) तसेच एका गुन्ह्यात कलम ६२ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
मालेगाव पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांमधील चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. यामध्ये ४१ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि चांदीच्या दागिन्यांचा समावेश असून, एकूण मुद्देमालाची किंमत ६ लाख २५ हजार रुपये आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतही घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे आणि मालेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश खेर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग इंगळे, पोलीस हवालदार गजानन झगरे, ज्ञानदेव मात्रे, आशिष बिडवे, पोलीस अंमलदार अमोल इरतकर, दीपक घुगे, संतोष वाघ, अशोक कोठुळे आणि चालक सुनील तायडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व मालेगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे घरफोडीच्या घटनांचा उलगडा होण्यास मदत झाली असून, नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी होण्यास हातभार लागणार आहे.