वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिल्यानगर येथील बसस्थानकातून चोरट्याला अटक केली Pudhari
वाशिम

Washim Bus Theft | बसमधून दागिने चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला बेड्या; अहिल्यानगर बसस्थानकातून आरोपीला अटक

वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; २.२५ लाखांची सोन्याची चैन जप्त

पुढारी वृत्तसेवा

Washim Bus Thief Arrested

वाशिम : बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हेरून गर्दीचा फायदा घेत त्यांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिल्यानगर येथील बसस्थानकातून अटक केली. शशिकांत विठ्ठल इधाटे (वय ३१, रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेली १४.७७० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, अंदाजे २ लाख २५ हजार रुपये किमतीची, जप्त करण्यात आली आहे.

७ सप्टेंबर २०२६ रोजी संजय शिवाजीराव पवार (वय ५०, रा. पाडेगाव, ता. खंडाळा, जि. सातारा, सध्या रा. छत्रपती संभाजीनगर) हे कारंजाहून छत्रपती संभाजीनगरकडे जाण्यासाठी कारंजा बसस्थानकावर आले होते. बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास केली. याप्रकरणी त्यांनी कारंजा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरू केला. बसमधून प्रवाशांचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर संशयिताचा शोध घेण्यासाठी कारंजा शहर परिसरासह इतर ठिकाणी तपास करण्यात आला.

दरम्यान, ९ सप्टेंबर रोजी सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी अहिल्यानगर येथे असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलिस निरीक्षक सुधाकर आढे यांनी तत्काळ पथक तयार करून ते अहिल्यानगरकडे रवाना केले. पथकाने अहिल्यानगर बसस्थानक परिसरात शोध घेतला असता संशयित आरोपी बसमध्ये बसून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आपले नाव शशिकांत विठ्ठल इधाटे असल्याचे सांगितले.

त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे चोरीस गेलेली सोन्याची चैन आढळून आली. पोलिसांनी चैन जप्त करून आरोपीला वाशिम येथे आणले. पुढील तपासासाठी त्याला कारंजा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कारंजा शहर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक लता फड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर आढे, सपोनि योगेश धोत्रे तसेच पोलिस हवालदार सूरज खडके, आशिष बिडवे, ज्ञानदेव मात्रे, गजानन झगरे, पोलिस अंमलदार अमोल इरतकर, संतोष वाघ आणि चालक सुनील तायडे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT