Police Raid Pudhari
वाशिम

Washim Police Raid | वाशीममधील देहविक्री अड्ड्यावर पोलिसांचा छापा; दोन संशयित ताब्यात

तीन महिलांची सुटका, मोबाईलसह २४ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

Washim Illegal Activities Raid

वाशीम : शहरातील जुनी आय.यू.डी.पी. कॉलनी परिसरातील एका अतिक्रमित जागेत सुरू असलेल्या कथित देहविक्री व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून दोन संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली असून, रोख रक्कम, दोन मोबाईल आणि अन्य साहित्य असा एकूण २४ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी (दि. २) करण्यात आली.

जुनी आय.यू.डी.पी. कॉलनी ही निवासी वस्ती असून, येथील एका मार्बल गोडाऊनजवळील अतिक्रमित जागेत काही काळापासून अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात होती.

गुप्त माहितीच्या आधारे वाशीम उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून माहितीची खातरजमा केल्यानंतर पथकाने घटनास्थळी छापा टाकला. यावेळी शोभा नामदेव थोरात (४२, रा. आय.यू.डी.पी. कॉलनी) आणि संजय केशव बेंद्रे (४२, रा. गव्हाणकर नगर) यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच पिंपरी चिंचवड, नागपूर आणि बीड येथील तीन महिलांची सुटका करण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळावरून ३ हजार ४५० रुपये रोख आणि बनावट ग्राहकाकडे देण्यात आलेले १ हजार ५०० रुपये, असे ४ हजार ९५० रुपये, तसेच २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि अन्य साहित्य जप्त केले.

या प्रकरणी वाशीम शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १४३(२) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३, ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. AHTU, स्थानिक गुन्हे शाखा आणि वाशीम शहर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT