Washim Bramha Liquor Ban:
लोकशाहीमध्ये जनमताचा आवाज किती प्रभावी ठरू शकतो, याचा प्रत्यय वाशिम जिल्ह्यातील ब्रम्हा येथे आला आहे. गावाच्या उंबरठ्यावर असलेल्या वाईन बारची विकृती गाडण्यासाठी येथील महिलांनी पुकारलेल्या एल्गाराला अखेर यश मिळाले असून, मतदानात 'आडव्या बाटली'च्या बाजूने ५२३ मते पडली, तर बार सुरू ठेवण्याच्या समर्थनार्थ केवळ १४ जणांनी मतदान केले. या निकालाने बारमालकाच्या धनशक्तीला आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेला सणसणीत चपराक लगावली आहे.
गावातील सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी ब्रम्हावासीयांनी यापूर्वी एक-दोनदा नव्हे, तर तब्बल तीन वेळा ग्रामसभा घेऊन बार बंद करण्याचा ठराव बहुमताने मंजूर केला होता. मात्र, प्रशासकीय यंत्रणेतील काही अधिकारी आणि बारमालक यांच्यातील साटेलोट्यामुळे जनतेचा हा रेटा जाणीवपूर्वक दाबला जात असल्याचे चित्र होते. ग्रामसभेच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यांवरील झापडे काढण्यासाठी अखेर ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले. या संघटित दबावापुढे प्रशासनाला नमते घ्यावे लागले आणि अखेर या विषयावर मतदानाची प्रक्रिया पार पडली.
या लढाईचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गावातील महिलांनी दाखवलेली अभूतपूर्व एकजूट. संसाराची चूल वाचवण्यासाठी पदर खोचून मैदानात उतरलेल्या या रणरागिणींनी दारूच्या मग्रुरीला चोख प्रत्युत्तर दिले. विशेष म्हणजे, ज्या लेकी-सुना लग्नानंतर परगावी गेल्या होत्या किंवा नोकरीनिमित्त बाहेर होत्या, त्यादेखील केवळ गावाच्या सन्मानासाठी पदरमोड करून मतदानासाठी पोहोचल्या होत्या. एकूण ८१६ महिला मतदारांपैकी ५५३ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला, ज्यात बार विरोधात ५२३ मतांचा डोंगर उभा राहिला.
सोळा मते बाद झाली असली तरी, केवळ १४ मतांवर मर्यादित राहिलेल्या समर्थकांमुळे बारमालकाची सद्दी संपुष्टात आली आहे. हा विजय केवळ एका गावापुरता मर्यादित नसून, अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या ग्रामीण भागासाठी एक दिशादर्शक ठरला आहे. गावाच्या सीमेवर नशा विकून घरे उद्ध्वस्त करणाऱ्यांविरुद्ध ब्रम्हाच्या महिलांनी दिलेला हा लढा जिल्ह्यातील इतर गावांमध्येही प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.