वाशीम : अजय ढवळे
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर वाशीम-अकोला महामार्गावर धारकाटा फाटा येथे आणि जांभरून फाटा यां दोन ठिकाणी रस्त्यावरील दुभाजक अनधिकृतपणे तोडण्यात आला आहे. स्वतःच्या हितासाठी तोडून अनधिकृतपणे वळण रस्ता तयार करण्यात आल्याने संबंधित ठिकाण अपघातांचे केंद्र बनत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याठिकाणी आजवर रस्ता ओलांडताना अनेक वाहनचालकांकडून या अनधिकृत वळणाचा सर्रास वापर होत आहे. समोरून येणाऱ्या वाहनांना अचानक वळण घेणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसून, त्यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
मुख्य रस्त्यावर सुरक्षित वाहतुकीसाठी उभारण्यात आलेला दुभाजक काही ठिकाणी तोडण्यात आला आहे. या ठिकाणी कोणतीही अधिकृत वाहतूक व्यवस्था किंवा दिशादर्शक चिन्हे नसतानाही वाहनचालकांकडून शॉर्टकट म्हणून या वळणाचा वापर केला जात आहे. विशेषतः भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे. त्यामुळे इथे अनेक वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
‘शॉर्टकट’ ठरतोय जीवघेणा!
वाहतूक कोंडी अथवा अंतर वाचविण्यासाठी तयार करण्यात आलेला हा अनधिकृत मार्ग आता वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दुभाजक तोडल्यामुळे रस्त्याची सुरक्षितता धोक्यात आली असून, अचानक वळण घेणारी वाहने मुख्य मार्गावरील वाहतुकीत अडथळा निर्माण करीत आहेत. परिणामी, किरकोळ अपघातांपासून गंभीर अपघातांपर्यंतच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
प्रशासनाने अपघाताची वाट पाहू नये
संबंधित विभागाने या ठिकाणाची तातडीने पाहणी करून दुभाजकाची झालेली तोडफोड पूर्ववत करावी. तसेच अनधिकृत वळण रस्ता कायमस्वरूपी बंद करून वाहनचालकांना अधिकृत मार्गाचा वापर करण्यास भाग पाडावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष
दुभाजक तोडून तयार करण्यात आलेला अनधिकृत वळण रस्ता बंद करून रस्त्याची सुरक्षितता पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे. आता संबंधित विभाग (MSRDC) महाराष्ट्र स्टेट रोड डवलेपमेंट कॉर्पोरेशन याकडे गंभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.