Washim Farmer Loan Waiver Demand
वाशिम: वाशिम तालुक्यातील अडोळी येथील शेतकऱ्यांनी आर्थिक संकटाच्या विळख्यात सापडल्यामुळे आता थेट शासनालाच गाव विकत घेण्याचे आवाहन करत ठिय्या आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. गुरूवारपासून (दि. २) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सुरू असलेल्या या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे.
गत काही वर्षांपासून सततची नापिकी, अतिवृष्टी, उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. या पार्श्वभूमीवर 'अडोळी गाव विकत घ्या आणि आम्हाला कर्जमुक्त करा' अशी अभूतपूर्व आणि धक्कादायक मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाने आमच्या समस्या गांभीर्याने न घेतल्यामुळेच आम्हाला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सरसकट कर्जमाफी देणे, वाशीम जिल्ह्यासाठी पीकविमा लागू करणे, खाजगी फायनान्स कंपन्यांकडून सुरू असलेली कर्जवसुली तात्काळ थांबवणे तसेच जिल्ह्यात एमआयडीसी प्रकल्प उभारून रोजगारनिर्मिती करणे या मागण्यांचा समावेश आहे.
या आंदोलनात युवा शेतकरी सतीश इढोळे, उपसरपंच भगवान इढोळे, परमेश्वर इढोळे, समाजसेवक राजकुमार पडघान, रामदास इढोळे, हनुमान इढोळे, नारायण इढोळे, प्रल्हाद खंडारे, माधव कोंडे, वामन पडघान, गणेश इढोळे, राजेंद्र खोलगाडे, राजू इढोळे, अर्जुना खंडारे, ज्ञानेश्वर इढोळे, गजानन इढोळे, अमोल खंडारे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले आहेत.
दरम्यान, भारतीय कृषी पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी नवनाथ मगरे आणि नितीन घुगे यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी चर्चा केली. मात्र, केवळ आश्वासनांवर समाधान न मानता ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. मात्र, प्रत्यक्षात कर्जमाफी जाहीर करताना केवळ दोन लाख रुपयांपर्यंत थकित कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाच मर्यादित दिलासा देण्यात आला आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येत असल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण आहे.
याशिवाय, कर्जमाफीसाठी विविध निकष लागू करण्यात येणार असल्याचे मंत्र्यांकडून सूचित करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे कोणत्याही अटी-शर्तीशिवाय सरसकट कर्जमाफी लागू करावी, अशी ठाम मागणी आंदोलक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.