Unseasonal Rainfall Washim Summer Crop Damage
वाशिम : अवकाळी पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापूस, हरभरा, मका, भाजीपाला यासारख्या पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी वाशिम जिल्हाधिकारी यांच्याशी तातडीने संपर्क साधून नुकसानग्रस्त क्षेत्रात तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी. पंचनाम्यात कोणतीही दिरंगाई करू नये.
ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे श्रम वाया जाऊ नयेत, यासाठी शासन दरबारी आपण पाठपुरावा करू, परंतु त्याआधी प्रशासनाने तातडीने कृती करणे अत्यंत आवश्यक आहे. मी स्वतः या विषयावर जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद साधणार आहे. शेतकऱ्यांनी धीर न सोडता संयम ठेवावा. व प्रशासन आपल्यासोबत असून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.