pudhari photo
वाशिम

Washim crime : कौटुंबिक वादातून जावयाची निघृण हत्या ; ३ मेहुण्यांना ५ वर्षांचा सश्रम कारावास

वाशिम येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. पी. झापटे यांनी या गुन्ह्याचा अंतिम निकाल १ ऑगस्ट रोजी घोषित केला

पुढारी वृत्तसेवा

वाशिम : कौटुंबिक कलह आणि किरकोळ वादाचे पर्यावसान एका तरुणाच्या निघृण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणी वाशिम येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. मृत तरुणाच्या तीन मेहुण्यांना दोषी ठरवून प्रत्येकी ५ वर्षे सश्रम कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. पुराव्यांभावी मृत तरुणाच्या पत्नीची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. वाशिम येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. पी. झापटे यांनी या गुन्ह्याचा अंतिम निकाल १ ऑगस्ट रोजी घोषित केला.

न्यायालयाने आरोपी विशाल उर्फ किसाना वसंत महाले (वय २८), सचिन वसंत महाले (वय २५) आणि अनिल उर्फ जगदीश परशराम महाले (वय २१) (सर्व रा. जांभूरुण महाली, ता. जि. वाशीम) यांना भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०५(२) [सदोष मनुष्यवध] सह कलम ३(५) अन्वये दोषी ठरवून ५ वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी १५,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगावा लागेल. तर, घटनेतील चौथी आरोपी आणि मृताची पत्नी शारदा नारायण इंगळे (वय ३७) हिच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ४९ अन्वये सबळ पुरावे नसल्याने तिची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

फिर्यादी पांडुरंग शिवराम इंगळे (रा. साखरा, ता. जि. वाशीम) यांचा मुलगा नारायण पांडुरंग इंगळे याचा विवाह १५ वर्षांपूर्वी आरोपी शारदा हिच्यासोबत झाला होता. त्यांना तीन लहान मुले आहेत. कौटुंबिक आणि जमिनीच्या वादातून नारायण आणि शारदामध्ये वारंवार भांडणे होत असत.

२३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा वाद झाला. यानंतर शारदाने तिच्या भावांना फोन करून बोलावून घेतले. दरम्यान, सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास नारायण हा त्याचे नातेवाईक प्रल्हाद इंगळे यांच्यासोबत राजमुद्रा ढाबा (कळंबा-महाली शिवार) येथे बसलेला असताना, त्याचे तिन्ही मेहुणे (विशाल, सचिन आणि अनिल) तेथे प्लास्टिकचे पाईप आणि लोखंडी रॉड घेऊन पोहोचले. "माझ्या बहिणीला का त्रास देतोस?" असे म्हणून त्यांनी नारायणवर प्राणघातक हल्ला चढवला. मध्यस्थी करायला गेलेले प्रल्हाद इंगळे आणि ढाब्यावरील कामगार अभिमान सावळे यांनाही आरोपींनी धमकावले. गंभीर जखमी झालेल्या नारायणला आरोपींनीच दुचाकीवरून ग्रामीण रुग्णालय, मंगरुळपीर येथे दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती नारायणला मृत घोषित केले.

या गुन्ह्याचा सखोल आणि वस्तुनिष्ठ तपास वाशीम-ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा API श्रीदेवी बळीराम पाटील यांनी केला. घटनेची माहिती मिळताच तपास अधिकारी श्रीदेवी पाटील यांनी पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवले, रक्तबंबाळ माती व वस्तू जप्त केल्या. आरोपी सचिन महाले याच्या माहितीवरून गुन्ह्यात वापरलेला लोखंडी पाईप (भारतीय साक्ष अधिनियम २०२३ च्या कलम २३(२) अंतर्गत) हस्तगत केला. तसेच घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलचे कॉल डिटेल्स आणि फॉरेन्सिक अहवाल एकत्र करून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत न्यायालयात भक्कम दोषारोपपत्र दाखल केले.

फिर्यादी व सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील पी. एस. ढोबळे यांनी बाजू मांडली, तर फिर्यादीला मदत करण्यासाठी वकील आर. एम. पुरोहित यांनी सहकार्य केले. सरकारी पक्षाने प्रत्यक्षदर्शी प्रल्हाद इंगळे यांची साक्ष, वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋचा घुणागे यांचा शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक पुरावे न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडले.

बचाव पक्षाने हा हल्ला जमिनीच्या वादातून आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत आरोपींना फसवल्याचा युक्तिवाद केला होता. मात्र, न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी सर्व साक्षी-पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि परिस्थितीजन्य पुरावे लक्षात घेता आरोपींचा हल्ला प्रत्यक्ष सिद्ध होत असल्याचे मान्य केले. मूळ हत्येच्या कलमाऐवजी घटनेचे स्वरूप आणि परिस्थिती पाहता आरोपींना भारतीय न्याय संहिता १०५(२) अन्वये दोषी ठरवून योग्य ती शिक्षा सुनावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT