वाशिम: पुढारी वृत्तसेवा : वाशिम शहरात आज (दि.१९) सार्वजनिक शिवजयंती महोत्सव थाटात साजरा करण्यात आला. शिवजयंती निमित्त जिल्ह्यात रक्तदान शिबिरासह विविध उपक्रम राबविण्यात आले. शिवजयंतीनिमित्त शिवभक्तांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. सार्वजनिक शिवजयंती उत्सव व मराठा सेवा संघाच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबवून शिवजयंती साजरी करण्याची परंपरा कायम ठेवली. (Shiv Jayanti 2025)
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने वाशिम शहरातून भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली. रक्तदान शिबिर, स्पर्धकांना बक्षीस वितरण तसेच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी श्री शिवाजी हायस्कूल येथून मोटर सायकल रॅलीला जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. एस व वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी हिरवी झेंडी दाखविली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली.
यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, निवासी जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, मुख्याधिकारी निलेश गायकवाड, तहसीलदार निलेश पळसकर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अनिल कावरखे आदी उपस्थित होते. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पुरण बदलाणी, सचिव गजानन भोयर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.