Husband Kills wife Samruddhi Mahamarg pudhari photo
वाशिम

Crime News: समृद्धी महामार्गावर थरार! ३ चिमुकल्यांना गाडीत झोपवून पत्नीला संपवले; मृतदेहासह रात्रभर प्रवास करून पती पोलिसांत हजर

Husband Kills wife Samruddhi Mahamarg: संशयाच्या सैतानी भुताने पछाडलेल्या पतीने समृद्धी महामार्गावरील कारंजा (लाड) परिसरात गाडी थांबवून आपल्याच पत्नीची निर्घृण हत्या केली.

पुढारी वृत्तसेवा

Husband Kills wife Samruddhi Mahamarg

वाशिम : अजय ढवळे

वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड हद्दीतील समृद्धी महामार्गावर एका थरारक आणि तितक्याच अंगावर काटा आणणाऱ्या क्रूरतेचा शेवट झाला. कलवर्धा (गौतमबुद्ध नगर, उत्तर प्रदेश) येथून निघालेली एक कार ग्रेटर नोएडाच्या दिशेने वेगात धावत होती; पण या प्रवासाचा शेवट इतका भयानक असेल, याची कल्पना कोणालाच नव्हती. संशयाच्या सैतानी भुताने पछाडलेल्या पतीने समृद्धी महामार्गावरील कारंजा (लाड) परिसरात गाडी थांबवून आपल्याच पत्नीची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर मृतदेह घेऊन स्वतः कारंजा शहर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि पत्नीची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले.

संशयाचं भूत आणि महामार्गावरील 'खूनी खेळ'

उत्तर प्रदेशातील कलवर्धा येथील रहिवासी असलेला ३० वर्षीय सलमान खान नेक मोहम्मद खान हा आपली २८ वर्षांची पत्नी हसीनबानो आणि तीन निष्पाप लहान मुलांसह कारने फिरायला जाऊया सांगून निघाला होता. आपले कुटुंब घेऊन समृद्धी महामार्गावरून जात असताना त्याच्या मनात मात्र संशयाचे आणि क्रूरतेचे भयानक मनसुबे शिजत होते.

गाडी समृद्धी महामार्गावरून कारंजा परिसराजवळ पोहोचली असता, मध्यरात्रीच्या सुमारास त्याने कार बाजूला घेतली. शांत आणि निर्मनुष्य ठिकाणी अचानक वाद सुरू झाला. तोवर कारमधील लहान मुले गाढ झोपेत असावीत. संशयाच्या अतिरेकातून सलमानने गाडीत ठेवलेला लोखंडी रॉड काढला आणि मागचा-पुढचा कोणताही विचार न करता हसीनबानोच्या डोक्यावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीचा जीव जात नाही हे पाहून त्याने तिचा गळा आवळला आणि तिचा श्वास कायमचा थांबवला.

....अन् सुरू झाला मृतदेहासोबत प्रवास

हत्या केल्यानंतर कोणत्याही सामान्य माणसाच्या काळजाचा ठोका चुकेल, पण सलमानच्या डोक्यावर जणू खून स्वार झाला होता. हसीनबानोचा निर्जीव मृतदेह कारमध्येच टाकून त्याने कारंजा परिसरातील रस्त्यांवर आणि महामार्गावर अनेक तास गाडी चालवली. शेजारी पत्नीचा थंड पडलेला मृतदेह, गाडीत मागे झोपलेली निष्पाप मुलं आणि स्टिअरिंगवर हात असलेला हत्यारा पती... हा सगळा थरार एखाद्या पडद्यावरील 'क्राईम थ्रिलर' सिनेमालाही मागे टाकणारा होता.

अनेक तास शहरात आणि महामार्गावर गाडी गोल-गोल फिरवल्यानंतर, अखेर पहाटेच्या सुमारास त्याच्यातील गुन्हेगार हतबल झाला. त्याने थेट कारंजा शहर पोलीस ठाण्यासमोर गाडी थांबवली आणि पोलिसांसमोर जाऊन शरणागती पत्करली. साब "मैने अपनी बिवी को मार डाला है, उसकी लाश बाहर कार मे है..." पोलीस ठाण्यात पहाटेच्या शांततेत आरोपीने उच्चारलेले हे शब्द ऐकून कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारीही हादरून गेले.

कारंजा पोलिसांनी तात्काळ गाडीची झडती घेतली असता त्यांना मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला. प्राथमिक चौकशीत आरोपी सलमानने पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्यानेच तिचा खून केल्याची कबुली दिली असली, तरी पोलिसांना या गुन्ह्यामागे संशय वाटत आहे.

पतीच्या जबाबात विसंगती

आरोपी पती पोलीस चौकशीत वारंवार आपले जबाब बदलत आहे. कधी तो एक सांगतो तर कधी दुसरीच कहाणी रचतो. कारमध्ये पती-पत्नी आणि मुलांव्यतिरिक्त आणखी एखादा तिसरा व्यक्ती सामील होता का? याचाही पोलीस कसून तपास करत आहेत. घटनेचे गांभीर्य आणि संशयास्पद बाबी लक्षात घेता कारंजा शहर पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक टीमला पाचारण केले. गाडीतून वैज्ञानिक पुरावे, रक्ताचे नमुने आणि बोटांचे ठसे गोळा करण्यात आले आहेत.

चारित्र्याच्या संशयातून घडलेल्या या थरारक हत्याकांडामुळे संपूर्ण समाजमन हादरून गेले आहे. फिरण्याच्या बहाण्याने आपल्या हसत्याखेळत्या कुटुंबाला मृत्यूच्या दारात ओढणाऱ्या या नराधम पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासणीनंतर या हत्येचे नेमके कारण समोर येईल. सध्या कारंजा शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT