वाशिम, पुढारी वृत्तसेवा : पीक विम्याची रक्कम ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना मिळेल, असे आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिले होते. मात्र, कंपनी म्हणते सरकारने त्यांच्या हिश्याचे पैसे भरले नाहीत. त्यामुळे पैसे देऊ शकत नाही. खरीप, रब्बीचा हंगाम संपला तरी पैसे मिळत नाहीत. येत्या पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा झाले नाहीत, तर मुंबईतील कार्पोरेट कंपन्यांच्या कार्यालयामध्ये घुसून पैसा वसूल करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आज (दि.३) वाशिम येथे पत्रकार परिषदेत दिला.
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी काल मला राज्यपाल करा, अशी मागणी जाहीर सभेत केली होती. यावर राजू शेट्टी यांनी सडकून टीका केली. सदाभाऊ सारख्या लोकांचा आणि जनसामान्यांच्या प्रश्नांचा सुतराम संबंध राहिला नाही. त्यामुळे ते असेच भीक मागत फिरतील, असा टोला लगावला.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. आता अर्थमंत्री अजित पवार राज्याची आर्थिक स्थिती बरोबर नसल्यामुळे आम्ही हे आश्वासन पाळू शकत नाही, असे सांगत आहेत. पवार गेल्या अनेक वर्षांपासून अर्थमंत्री आहेत. मागच्या सरकारमध्येही ते अर्थमंत्री होते. त्यांना राज्याच्या एकूण आर्थिक स्थितीची खडानं खडा माहिती होती. मग महायुतीने जाहीरनाम्यात कर्जमाफीचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची मत घेऊन शेतकऱ्यांचा विश्वासघात का केला? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
देशाचे कृषिमंत्री संसदेत सांगतात गेल्या पाच वर्षांमध्ये शेतकऱ्याचे उत्पन्न वाढले. मग त्यांनी पाच वर्षांपूर्वी शेतमालाला मिळणारा भाव आणि आज मिळणारा भाव याची श्वेतपत्रिका काढावी. म्हणजे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढले की खर्च वाढला, हे कळेल, असे शेट्टी म्हणाले.