Rashin Mahatma Phule Chowk incident
वाशिम: राशीन (ता. कर्जत) येथील चौकात ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार उभारण्यात आलेल्या महात्मा फुले यांच्या फलकाची समाज कंटकांकडून विटंबना करण्यात आल्याच्या घटनेचा जिल्ह्यात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात आज (दि. ४) अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून दोषींवर तत्काळ कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, काही समाज कंटकांकडून महात्मा फुले यांच्या विचारांना नष्ट करण्यासाठी ठिकठिकाणी त्यांच्या पुतळ्याची व फलकाची विटबंना केल्या जात आहे. यासंदर्भात कर्जत तालुक्यातील राशीन गावात २०१४ साली ग्रामपंचायतचा ठराव घेवून चौकात महात्मा फुले यांचा नामफलक गावकर्यांनी मोठया मेहनतीने उभारला होता. मात्र, काही समाजकंटकांनी २ ऑगष्ट रोजी या फलकाची तोडफोड केली व विटंबना केली.
या प्रकारामुळे महात्मा फुले यांना मानणार्या महाराष्ट्रातील समस्त अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत. तरी फलकाची विटंबना करणार्या जातीयवादी समाजकंटकांना त्वरीत अटक करावी व त्यांना कठोर शिक्षा करावी. अन्यथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
यावेळी गजानन ठेंगडे, उषाताई वानखेडे, राम गाभणे, बालुभाऊ मुरकुटे, गजानन लांडगे, शाम दळवी, संतोष वानखेडे, अनिल चौधरी, नवनीत राऊत, शुभम वानखेडे, अनिल भडके, राम बोरा, बालाजी ठेंगडे, अजय बिटोडे, विशाल भालेराव, विनोद मेरकर, गणेश डाळ, संगीता पिंजरकर, वैष्णवी कोल्हे, सागर इंगळे आदी उपस्थित होते.