वाशिम: पुढारी वृत्तसेवा : कारंजा शहरातील राठोड मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटलमध्ये लिंग निदान केले जात असल्याच्या माहितीवरून आरोग्य विभागाच्या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकला. यावेळी ५ गर्भवती महिला गर्भलिंग निदान करताना आढळून आल्या. सोनोग्राफी मशीन सील केले असून गर्भनिदान करणाऱ्या डॉक्टर रजनी राठोड यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (Washim News)
राठोड मेटरनिटी हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान होत असल्याची गुप्त माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानंतर ६ सदस्यांच्या पथकाने सापळा रचला आणि एका गर्भवती महिलेला रुग्ण म्हणून रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथे तिची भेट एका एजंटशी झाली. ज्याने तिला आश्वासन दिले की, लिंग निदान केले जाईल. त्यासाठी २० हजार रुपये आकारले जातील. त्या बनावट गर्भवती महिलेने संपूर्ण प्रकरण आरोग्य विभागाच्या ६ सदस्यांना सांगितले. (Washim News)
रुग्णालयावर छापा टाकल्यानंतर, ५ गर्भवती महिला रुग्णालयात बसलेल्या आढळल्या. यापैकी २ गर्भवती महिला बुलढाणा जिल्ह्यातील, २ अकोला जिल्ह्यातील आणि १ वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातील होती. वरिष्ठांना छाप्याची माहिती दिल्यानंतर आरोग्य विभागाच्या विभागीय पथकाने सोनोग्राफी मशीन सील केली. आरोग्य विभागाच्या पथकाने एजंटकडून ६० हजार रुपये आणि ५ मोबाईल जप्त केले आहेत.
ही जिल्ह्यातील दुसरी मोठी कारवाई असून, जन्म होण्यापूर्वीच निष्पाप चिमुकल्यांचा घात केला जात असल्याचे उघड झाले आहे. रिसोडनंतर आता कारंज्यातही बेकायदेशीर गर्भपात होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उमलण्यापूर्वीच निष्पाप कळ्यांचा बळी घेतला जात आहे. केवळ पैशांसाठी काही डॉक्टर हे अमानुष प्रकार करत आहेत. स्त्री भ्रूण हत्येच्या गोरखधंद्यात रिसोडनंतर आता कारंजातील डॉक्टर रजनी राठोड आणि त्याचा सहकारी कारवाईच्या जाळ्यात अडकले आहेत. या घटनेमुळे समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन कठोर कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.