रिसोड, पुढारी वृत्तसेवा : वाशिमच्या रिसोड येथील भारत माध्यमिक शाळेत इयत्ता 12 वी च्या परीक्षेदरम्यान इंग्रजी विषयाचा पेपर सुरू असताना मास कॉपी झाल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणी शाळेच्या शिपायाविरोधात रिसोड पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Washim News)
भारत माध्यमिक विद्यालय भाजप नेते आणि माजी मंत्री अनंतराव देशमुख हे अध्यक्ष असलेल्या आर्य शिक्षण संस्थेकडून चालवले जाते. त्यामुळे या शाळेवर कारवाई करतात का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
12 वी ची परीक्षा कॉपी मुक्त आणि भय मुक्त पार पडाव्यात यासाठी प्रशासन विशेष अभियान राबवित असून यासाठी वेगवेगळे बैठे आणि भरारी पथके नेमण्यात आले आहेत. दरम्यान, काल पहिल्याच दिवशी वाशिमच्या रिसोड शहरातील भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत इंग्रजी विषयाचा पेपर सुरू असताना वाशिमचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या पथकाने धाड टाकली. यावेळी मास कॉपी केलेल्या 125 कॉपी एकत्र करून पळून जात असलेला अस्थायी शिपाई कार्तिक चिभडे याला पकडले. त्यानंतर चौकशी अंती त्या शिपायावर रिसोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे मास कॉपी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कॉपी करणाऱ्यांची कोणतीही गय होणार नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नवदिप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात रिसोड पोलीस करत आहेत.