Manora Panchayat Samiti Gram Rojgar Sevak Assault
वाशीम: मानोरा तालुक्यातील गादेगाव येथील ग्राम रोजगार सेवकाला पंचायत समितीच्या कार्यालयातच चपलेने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरकुलाचे मस्टर मुद्दाम टाकले जात नसल्याच्या रागातून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्राम रोजगार सेवक ग्रामसभेच्या ठरावाचा अहवाल पंचायत समितीमध्ये जमा करण्यासाठी गेले होते. यावेळी सुदाम भिका जाधव आणि त्यांची मुलगी पुष्पा महादेव चव्हाण यांनी रोजगार सेवकाशी अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर चपलेने मारहाण केल्याचा आरोप आहे.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात चर्चेला उधाण आले आहे. रोजगार सेवकाने दिलेल्या तक्रारीवरून सुदाम भिका जाधव आणि पुष्पा महादेव चव्हाण यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास मानोरा पोलीस करीत आहेत.