Fake police exposed!Gold worth 6 lakh 50 thousand was seized by raiding the Iranian settlement
वाशिम : पुढारी वृत्तसेवा वाशिम शहरात बनावट पोलीस बनून केलेल्या फसवणुकीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने ४८ तासांच्या आत उघडकीस आणला आहे. या प्रकरणी ६ लाख ५० हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २:३० वाजताच्या सुमारास फिर्यादी देवेंद्र ओंकारसिंग किल्लेदार (रा. वाशिम) हे सोनखास रोडने जात असताना अज्ञात दोन व्यक्तींनी त्यांना थांबवले. "मागे लुटमार झाली आहे, तुमच्या गळ्यातील गोफ आणि अंगठ्या काढून ठेवा," असे सांगून आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी केली. त्यानंतर हातचलाखी करून फिर्यादीला बनावट अंगठी असलेली कागदाची पुडी दिली आणि त्यांच्या जवळील ३० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी (चेन) व १६ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या घेऊन पळ काढला. या प्रकरणी पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे गुन्हा नोंदवण्यात आला होता.
गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्हा हसन अली शेखू बेग (वय ३५, रा. इराणी गल्ली, शिवाजी नगर, परळी वैजनाथ, जि. बीड) व त्याच्या साथीदाराने केल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीच्या शोधासाठी एक पथक ३ सप्टेंबर २०२६ रोजी परळी वैजनाथ येथे पाठवण्यात आले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीच्या राहत्या घरी शोध घेण्यासाठी पथक गेले असता, पोलिसांचे वाहन पाहून संशयित आरोपी हसन अली शेखू बेग हा दुचाकीवरून पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, मात्र तो हाती लागला नाही.
यानंतर पंचांसमक्ष आरोपीच्या घराची झडती घेतली असता, गुन्ह्यात गेलेला मुद्देमाल २९.०७० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी (चेन), ७.९२० ग्रॅम वजनाची सोन्याची कासवाच्या आकाराची अंगठी, ७.२५० ग्रॅम वजनाची सोन्याची खड्याची अंगठी असा एकूण ६ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर आडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे तसेच पोलीस अंमलदार गजानन झगरे, आशिष बिडवे, ज्ञानदेव म्हात्रे, अमोल इरतकर, दीपक घुगे, संतोष वाघ आणि सुनील तायडे यांनी केली.