जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा २१ एप्रिलच्या संपावर बहिष्कार  file photo
वाशिम

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा २१ एप्रिलच्या संपावर बहिष्कार

वाशिम जिल्हा परिषद कर्मचारी संपात उतरणार नाहीत

पुढारी वृत्तसेवा

District Council Employees Boycott April 21 Strike

वाशिम : पुढारी वृत्तसेवा

राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष विश्वास काटकर यांनी घेतलेल्या एकतर्फी निर्णयामुळे कर्मचारी संघटनांमध्ये उभी फूट पडली आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष करणे आणि जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चूलबुले यांना विश्वासात न घेता संपाच्या नोटिसा काढणे, या प्रकारामुळे वाशिम जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने २१ एप्रिलच्या संपावर पूर्णतः बहिष्काराचे हत्यार उपसले आहे.

राज्य कर्मचारी महासंघाने पुकारलेल्या या संपातून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. विश्वास काटकर हे केवळ ठराविक संवर्गाचे नेतृत्व करत असून, ते जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, असा गंभीर ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याच नाराजीतून आता महाराष्ट्रातील जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय वाशिमच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

वाशिम जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी, प्रशासन विभाग, शिक्षक आणि सर्व संवर्गातील अधिकारी-कर्मचारी २१ एप्रिलच्या संपात सहभागी होणार नाहीत. विश्वास काटकर यांच्या कार्यपद्धतीचा निषेध करत, उमेशचंद्र चूलबुले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा पवित्रा घेण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषद कर्मचारी या संपाकडे पाठ फिरवून आपले काम सुरू ठेवणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.

जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष विजय धुमाळे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या संपात सामील न होण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. यामध्ये लिपीक वर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल कापसे, राज्य स्तरावरील जिल्हा परिषद कर्मचारी महिला उपाध्यक्ष श्रीमती स्वाती वानखडे आणि जिल्हा संघटक ज्ञानेश्वर (नानाभाऊ) तुर्के यांनी सर्व कर्मचाऱ्यांना संपात सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे.

या निर्णयामुळे राज्य स्तरावर मोठी खळबळ उडाली असून, कर्मचारी चळवळीतील गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे. २१ एप्रिल रोजी वाशिम जिल्ह्यात संपाचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे आता निश्चित झाले आहे.

राज्य महासंघाचे नेतृत्व करताना विश्वास काटकर यांनी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली आहे. आमच्या राज्याध्यक्षांना (उमेशचंद्र चूलबुले) विश्वासात न घेता संपाचे राजकारण करणाऱ्यांना आम्ही साथ देणार नाही. वाशिम जिल्ह्यातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी २१ एप्रिल रोजी आपल्या कर्तव्यावर हजर राहावे.
विजय धुमाळे जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ वाशिम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT