Washim Natyagruha Opening  
वाशिम

Washim Natyagruha Opening | करोडो रुपयांचे नाट्यगृह धुळखात; तातडीने सुरू करण्याची मागणी...

Washim Natyagruha Opening | शहराच्या सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जाणारे अकोला नाका परिसरातील नाट्यगृह तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पूर्णत्वास गेले असले, तरी अद्यापही ते नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले नाही.

पुढारी वृत्तसेवा

वाशिम : (अजय ढवळे)
शहराच्या सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जाणारे अकोला नाका परिसरातील नाट्यगृह तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पूर्णत्वास गेले असले, तरी अद्यापही ते नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले नाही. त्यामुळे हे नाट्यगृह तातडीने सुरू करावे, अशी मागणी ६ एप्रिल रोजी आम आदमी पार्टीचे राम पाटील डोरले यांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात नमूद केले की, शहरातील नाट्यगृह उभारणीसाठी करोडो रुपयांचा निधी खर्च झाला. काम पूर्ण होऊन सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही ते बंद अवस्थेतच आहे. सध्या नाट्यगृहातील खुर्च्या, ध्वनीव्यवस्था, प्रकाशयोजना तसेच इतर तांत्रिक साहित्य वापराअभावी धुळखात पडले असून काही ठिकाणी त्याची झीजही होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

नाट्यगृह सुरू झाल्यास वाशिम शहरात नाट्यप्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम, व्याख्याने, संगीत मैफिली तसेच विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी एक सुसज्ज व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. विशेषतः स्थानिक कलाकार, नाट्यसंस्था, विद्यार्थी व सामाजिक संघटनांना याचा मोठा फायदा होणार असून शहराच्या सांस्कृतिक जीवनाला नवी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, आम आदमी पार्टीचे राम पाटील डोरले यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे याबाबत वारंवार निवेदने देत सतत पाठपुरावा केला असून नाट्यगृह तातडीने सुरू करण्याची मागणी सातत्याने लावून धरली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास, दिनांक १ मे २०२६ (महाराष्ट्र दिन) रोजी या नाट्यगृहाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्येही नाट्यगृह लवकर सुरू करण्याची मागणी जोर धरत असून नगरपरिषद प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन नाट्यगृह नागरिकांसाठी खुले करावे, अशी जोरदार अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या या प्रकरणाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT