Illegal Weapon Arrest Washim
वाशीम : वाशीम शहरातील पंचशील नगर परिसरात एक व्यक्ती देशी बनावटीची पिस्टल घेऊन राजरोसपणे फिरत असल्याची विश्वासार्ह माहिती पोलीस दलाला मिळाल्यानंतर, दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वाशीमच्या पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपीस रंगेहात अटक केली. ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करून पंचशील नगर परिसरात रवाना करण्यात आले. दरम्यान, आरोपी जागमाता परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पथकाने तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. महादेव मंदिराजवळ एक इसम संशयास्पदरीत्या उभा असल्याचे आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाण्याच्या तयारीत असताना पथकाने मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले.
आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून स्टील धातूची देशी बनावटीची पिस्टल जप्त करण्यात आली. सदर पिस्टलला दोन्ही बाजूंनी ब्राऊन रंगाचे फायबर ग्रीप असून त्यावर पिवळ्या रंगाचे स्टार चिन्ह आहे. तसेच मॅगझिनमध्ये दोन जिवंत राउंड आढळून आले.
आरोपीची चौकशी केली असता त्याने आपले नाव पवन चिंतामण जोरेवार (वय २२), रा. पंचशील नगर, वाशीम असे सांगितले. त्याला पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन वाशीम शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर शस्त्र त्याने कधी, कोणाकडून व कशासाठी मिळवले, याबाबत अधिक तपास सुरू आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अगरवाल, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहायक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.