Wardha crime news
वर्धा : पंकज गादगे
प्रेमसंबंधात पती अडथळा ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेह गावाजवळील विहिरीत फेकून दिला. एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही, तर पती बेपत्ता असल्याची तक्रारही पत्नीनेच पोलिसांत दाखल केली. मात्र, पोलिसांच्या तपासात या संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा झाला. शेकापूर बाई, ता. हिंगणघाट येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पत्नी सपनासह चौघांना वडनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संतोष पांडुरंग कैकाडे (वय ४२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांकडे दाखल फिर्यादीनुसार, संतोष यांची पत्नी सपना कैकाडे हिचे संतोष यांचेच चुलत भाऊ शुभम कैकाडे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधात संतोष अडथळा ठरत असल्याने त्यांचा काटा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
१६ ऑगस्टच्या मध्यरात्री साडेबारा ते दीडच्या दरम्यान संतोष यांच्या राहत्या घरी हा प्रकार घडल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. सपना हिने प्रियकर शुभम कैकाडे आणि त्याचे दोन साथीदार सचिन बसुणे व प्रशांत करपे यांच्या मदतीने संतोष यांचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो गावाजवळील बोबडे यांच्या विहिरीत फेकून देण्यात आला.
हत्येनंतर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. संतोष बेपत्ता असल्याचे भासवून पत्नी सपना हिनेच वडनेर पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांना या प्रकरणातील काही बाबींवर संशय आला. त्यामुळे तपासाची दिशा बदलण्यात आली. संशयितांची चौकशी आणि उपलब्ध माहितीच्या आधारे तपास पुढे नेताना प्रेमसंबंधाचा धागा पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर हत्याकांडाचा संपूर्ण घटनाक्रम उघडकीस आला.
या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे संतोष आणि शुभम हे चुलत भाऊ आहेत. एकीकडे रक्ताचे नाते आणि दुसरीकडे संतोष यांच्या पत्नीशी असलेले प्रेमसंबंध, या पार्श्वभूमीवरच हत्येचा घटनाक्रम घडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी देवानंद पांडुरंगजी कैकाडे (वय ५०) रा. शेकापूर बाई यांच्या फिर्यादीवरून वडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शुभम रमेशराव कैकाडे (३०), सचिन प्रभाकर बसुणे (३०), प्रशांत रमेश करपे (३६) आणि सपना संतोष कैकाडे (३६) या चौघांना ताब्यात घेतले आहे. हत्येचा नेमका घटनाक्रम, कटाची आखणी आणि प्रत्येकाची भूमिका याबाबत पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी गोविंद गवळी, पोलीस निरीक्षक घनश्याम पाटील, पोलीस उपनिरीक्षक भारत वर्मा तसेच पोलीस पथकाने केली.
प्रेमसंबंधातून पतीची हत्या, मृतदेहाची विहिरीत विल्हेवाट आणि त्यानंतर पत्नीनेच पती बेपत्ता असल्याची तक्रार केल्याने या प्रकरणाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आता पोलिसांच्या पुढील तपासात या हत्याकांडामागील आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे लक्ष लागले आहे.