वर्धा : शहरालगतच्या पिपरी (मेघे) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कारला चौकापासून शहरात येणाऱ्या मार्गाच्या कडेला भाजीची दुकाने लावली जातात. त्यामुळे अनेकदा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायतच्या वतीने स्वतंत्र भाजी मंडईची मागणी करण्यात येत होती. आता वर्दळीची प्रचंड लोक घणता असलेली मुख्य वसाहत ग्रामपंचायत पिपरी (मेघे) येथील सर्वे नं. ३५ शासकीय जमिनीतील ०.२० हे. आर. जागेवर सुसज्ज भाजी मंडई साकारणार आहे. राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकाराने येथील भाजी मंडईचे स्वप्न साकार होणार आहे.
वर्धा शहराला जुळून असलेला अविभाज्य परिसर पिपरी (मेघे) ग्रामपंचायत या परिसरात मोठ्या संख्येने नागरीकरण होत आहे. वर्धा शहरात प्रवेश करण्यासाठी समृध्दी महामार्ग, तुळजापूर- नागपूर राज्यमार्ग, अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालयासह, शाळातून ये-जा करणारी विद्यार्थ्यांची रहदारी, तथा जड वाहतूक यात भरीसभर म्हणजे डॉ. शाहू हॉस्पीटल ते कारला चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेली भाजी विक्रेत्यांची दुकाने असतात.
ग्राहकांची भाजी खरेदीसाठी होत असलेली गर्दी कित्येकदा अपघाताला कारणीभुत ठरलेली आहे. ही भीषण समस्या लक्षात घेता ग्रामपंचायत पिपरी (मेघे) च्या वतीने वेळोवेळी प्रशासनाचे व संबधितांचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न झालेले आहेत. या गंभीर जीवघेण्या समस्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायत पिपरी (मेघे) चे माजी सरपंच तथा सदस्य अजय गौळकर आणि सामाजिक कार्यकर्ते अजय वरटकर यांनी मुंबई सचिवालयात ठाण मांडून राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री डॉ. पंकज भोयर यांना निवेदनाव्दारे विनंती केली.
भाजी मंडईची अत्यावश्यक व ज्वलंत गरज लक्षात घेता पालकमंत्री पंकज भोयर यांनी राज्य शासनाचे उपसचिव यांना निर्देश देत शासनाची मान्यता देण्यात आल्याचा शासन निर्णय पारीत केला. पिपरी (मेघे) ग्रामपंचायत येथील सर्वे नं. ३५ वरील ०.२० हे. आर. शासकीय जमिनीवर सुसज्ज भाजी मंडई साकार होण्याचे स्वप्न अथक प्रयत्नानंतर लवकरच पूर्ण होणार आहे.