वर्धा : शेतजमिनीच्या वादातून वर्धा जिल्ह्यातील निमसडा येथील शेतशिवारात दोघांची हत्या करत हत्या करणार्याने स्वत: विष प्राशन करत आत्महत्या केली. या घटनेमुळे शेतशिवार रक्ताळला. मन सुन्न करणारी ही घटना २८ जून रोजी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेत पुतण्यानेच काकू व चुलत भावाची हत्या केली.
साधना मोहिजे (वय ५५), नितीन मोहिजे (वय २७) रा. निमसडा अशी हत्या झालेल्यांची नाव आहेत. महेंद्र मोहिजे (वय ४५) असे मृतक आरोपी पुतण्याचे नाव आहे. साधना मोहिजे आणि त्यांचा मुलगा नितीन मोहिजे सकाळच्या सुमारास शेतात होते. त्यावेळी शेतीवरून वादातून महेंद्र मोहिजे याने साधना मोहिजे, नितीन मोहिजे यांची कुर्हाडीने वार करून हत्या केली. यातच महेंद्र मोहिजे यानेही स्वत: विष प्राशन केले. महेंद्रला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अल्लीपूर ठाणेदार विजय घुले यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षक अनुराग जैन, पोलीस अप्पर अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण यांनी भेट देत माहिती घेतली. पुढील तपास अल्लीपूर पोलिस करीत आहेत.