वर्धा : वर्धा जिल्ह्यात दोन दिवसातील मुसळधार पावसामुळे शेतशिवारात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टीने जिल्ह्यात सुमारे तीन हजार हेक्टरवरील क्षेत्रात पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कारंजा (घाडगे) तालुक्यात सहा हेक्टर शेतजमिन खरडून नुकसान झाले. कृषि विभागाच्या वतीने तीन हजार हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज माहिती आहे. दरम्यान, पंचनाम्यानंतर या आकडेवारीत बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वर्धा जिल्ह्यात ८ आाणि ९ जुलै रोजी जोरदार पाऊस बरसला. जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यातील ५४ पैकी ५० मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याचे सांगण्यात आले. मुसळधार पावसाने नदी, नाल्यांना पूर आल्यामुळे शेतकर्यांनी पेरणी केलेल्या पिकांचे नुकसान झाले.
नदी, नाल्यांच्या काठावर असलेल्या तसेच पाणी साचलेल्या शेतातील पिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सुमारे १४३ गावांमध्ये ३५९६ शेतकर्यांचे ३ हजार २१७ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या अनेक शेतकर्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. जिल्ह्यात कपाशी, तूर, सोयाबीनसोबतच फळपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा नजरअंदाज नुकसानीचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंचनाम्यानंतर या आकडेवारीत बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.