वर्धा : पोलिसांनी कपाशीच्या बनावट बियाण्यासह ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये कपाशीचे बनावट बियाणे, वाहन, पॅकेट तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत एकास अटक करण्यात आली. ही कारवाई सेलू, टाकळी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ९ मे रोजी केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सेलू पाोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. पोलिसांनी मिळालेल्या गोपनिय माहितीवरून सेलू येथील विकासनगर येथील एका प्लॉटमध्ये टिनाने शेडने तयार केलेल्या गोदामात छापा घातला. तेथे एक इसम त्याच्या ताब्यातील कारमध्ये बनावट कपाशी बियाण्याच्या पिशव्या भरताना रंगेहात मिळून आला. कृषी अधिकारी व पोलिसांनी त्यास नाव पत्ता विचारला असता त्याने गोपाल सुरेश पारडकर (वय ३५), रा. टाकळी (झडशी) ता. सेलू, जि. वर्धा असे सांगितले.
गोदामातून बनावटी कपाशी बियाणे भरुन असलेल्या प्लास्टिकच्या २६ बॅग, ज्यामध्ये विविध कंपन्यांच्या नावाचे १४६६ पॅकेट, ११८५ किलो खुले कापूस बियाणे, एम.एच. ०२ डी.एन. ९६५८ क्रमांकाची कार, मोबाईल आदी जप्त मुद्देमाल जप्त केला. चौकशीत बनावटी बियाणाचे सिलींग व लेबलींग टाकळी येथे त्याच्या घरी करीत असल्याची माहिती मिळाली. घरी पाहणी केली ईलेक्ट्रीक पॅकिंग मशीन, दोन ईलेक्ट्रीक वजनकाटे, रिकामे पॅकेट आदी मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी एकूण ५० लाख ३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले, राहुल ईटेकर, गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, भूषण निघोट, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय बमनोटे, सेलूचे कृषी अधिकारी एस. आर. मुरारकर, एम. व्हि. नागपुरकर, तालुका कृषी अधिकारी सि. आर. माहुले, विस्तार अधिकारी एन. टी. चिरंगे यांनी केली.
टाकळी (झडशी) येथे राहणारा गोपाल पारडकर याने गुजरात येथून बनावटी कपाशीचे बियाणे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेले असतानासुध्दा मोठ्या प्रमाणात साठवणूक करुन बनावटी कपाशी बियाण्याचे पॅकींग व लेबलींग करुन अवैधरित्या चढ्या भावाने जास्त पैशात विक्री करुन शेतकर्यांची आर्थिक फसवणूक करत असल्याची माहिती पुढे आली. गुजरात येथून बनावटी कपाशी बियाणे खरेदी करून त्याचे पॅकिंग व लेबलींग करत वेगवेगळया व्यक्तींना विक्री केली असल्याची माहिती पुढे आली. सर्व आरोपींनी कपाशी बियाण्याला विक्रीकरीता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध घोषीत केले असतानाही बनावटी कपाशी बियाणे शेतकर्यांना खरे असल्याचे भासवून फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.