

जळगाव : शेतकऱ्यांना बियाणे व खताबाबत कंपन्यांपेक्षा विक्रेत्यांनीच योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले. जिल्हा नियोजन भवन येथे खरीप 2025 हंगामापूर्वी कृषी निविष्ठा उत्पादक व विक्रेत्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री सावकारे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तडवी आदी उपस्थित होते.
सावकारे म्हणाले, "शेतकरी हा खतविक्रेत्यांवर विश्वास ठेवून खरेदी करतो. त्यामुळे तुमची जबाबदारी अधिक आहे. कमी दर्जाचे उत्पादने विकू नका. सध्या रासायनिक खतांच्या दुष्परिणामांमुळे शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. त्यामुळे कंपोस्ट खत व सेंद्रिय उत्पादनांची मागणी वाढलेली आहे."
उत्तर महाराष्ट्रात कापसाचे उत्पादन विदर्भाच्या तुलनेत अधिक असले तरी गुणवत्ता कमी आहे. गुणवत्ता आणि उत्पादन वाढवण्यासाठी कंपन्या शेतकऱ्यांना बियाणे व खते थेट देत आहेत. यामुळे विक्रेत्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. "शेतकरी व कंपन्यांमध्ये थेट व्यवहार वाढल्यास विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात येईल. त्यामुळे शेतकरी जेव्हा तुमच्याकडे येतो, तेव्हा त्याच्या जमिनीला योग्य असे उत्तम दर्जाचे बियाणे व खतेच सुचवा. शेतकऱ्याचा फायदा झाला तर तुमचाही होईल," असेही त्यांनी स्पष्ट केले.