वर्धा: स्थानिक गुन्हे शाखेने वर्ध्यात एका मोठ्या अमली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश करत १६ लाख रुपये किमतीचे ४०० ग्रॅम एम.डी. (मेफेड्रोन) आणि एक अग्निशस्त्र जप्त केले आहे. पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत मुंबईहून आलेल्या दोन महिलांसह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचे धागेदोरे जून महिन्यात उघडकीस आलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांशी जुळले आहेत. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या आरोपींनी व्यसनाधीनतेमुळे घरफोड्या करत असल्याची कबुली दिली होती. ते एम.डी. अमली पदार्थ वर्ध्यातील आनंदनगर येथील मुन्ना उर्फ राजन थूल याच्याकडून खरेदी करत असल्याची माहिती त्यांनी दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पाळत ठेवली होती.
नुकतेच, मुंबई येथील दोन महिला मोठ्या प्रमाणात एम.डी. घेऊन विशाल थूल याच्या घरी आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशाल थूलच्या घरावर छापा टाकला. यावेळी विशालची पत्नी आरती, तसेच मुंबईहून आलेल्या आफरीन सलीम शेख आणि हुमेरा रमजान शेख यांच्या ताब्यातून १२ लाख रुपये किमतीचे ३०० ग्रॅम एम.डी., एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. चौकशीत आरतीने एम.डी. खरेदीसाठी आफरीनला ऑनलाइन पैसे पाठवल्याचे उघड झाले.
तपासादरम्यान, विशाल थूलचा नोकर प्रदीप रामचंद्र मिसाळ याच्याकडून ४ लाख रुपये किमतीचे १०० ग्रॅम एम.डी. आणि एक अग्निशस्त्र जप्त करण्यात आले. या संपूर्ण कारवाईत एकूण १७ लाख १९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाचही आरोपींविरुद्ध वर्धा शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
ही यशस्वी कारवाई अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.