Karanja Taluka Voter List Revision
वर्धा : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात (SIR) वर्धा जिल्ह्याने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कारंजा तालुक्यातील ढगा हे गाव विदर्भातील एसआयआरचे १०० टक्के काम पूर्ण करणारे पहिले गाव ठरले आहे. या यशाने संपूर्ण जिल्ह्यात एसआयआर कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि सततच्या पाठपुराव्यामुळे हे यश संपादन करणे शक्य झाले. प्रशासकीय पातळीवर या मोहिमेचे नियोजन आणि अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे करण्यात आली. या मोहिमेच्या यशात संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे ठरले आहे.
एसआयआर कार्यक्रमासाठी आर्वीचे उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, कारंजाचे परीविक्षाधिन उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विनायक पाटील, कारंजाचे तहसीलदार अनिल निनावे, ढगाचे मंडळ अधिकारी, तलाठी विशेषतः मतदान केंद्रस्तरीय अधिकारी शकील शेख यांनी अतिशय परिश्रम घेत मतदारांपर्यंत पोहोचून हे काम १०० टक्के पूर्ण केले आहे.
लोकशाही बळकटीकरणाच्या दृष्टीने मतदार यादीची शुद्धता आणि अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वाचे असते. ढगा गावाने दाखवून दिलेल्या या आदर्शवत कामामुळे इतर गावांसाठी एक नवी प्रेरणा मिळाली आहे. जिल्हा प्रशासनाने या यशाबद्दल ढगा गावच्या ग्रामस्थांचे आणि या मोहिमेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.