

वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील रासा घोंसा येथे पिल्ल्यासह अस्वलाने घराच्या आवारात ठिय्या मांडला. जंगलाशेजारी असलेल्या गावामध्ये गुरुवारी ३ जुलै रोजी ही घटना घडली. सकाळी सहा वाजताच्या सुमारास नागरिकांनी अस्वलासह जंगलाच्या दिशेने हाकलले.
समुद्रपूर तालुक्यातील रासा घोंसा येथे पहाटेच्या सुमारास संदीप पडवे हे लघुशंकेसाठी बाहेर पडले. दरम्यान, यावेळी विद्युत पुरवठा खंडीत होता. सुरूवातीला त्यांना म्हैस असल्याचा भास झाला. मोबाईलच्या लाईटने बघितले असता त्यांना अस्वल व पिल्लू दिसले.
त्यांनी गावातील लोकांना याची माहिती दिली. गावकर्यांनी अस्वल आणि पिल्ल्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही अस्वल आणि पिल्लू हटायला तयार नव्हते. सकाळी ६ वाजताच्या सुमारास गावकर्यांनी अस्वल आणि पिल्ल्याला जंगलाच्या दिशेने हाकलून लावले. वनविभागाच्या वतीने संरक्षणात्मक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.