वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील गिरड सहवनपरिक्षेत्र येत असलेल्या मोहगाव शिवारात चरायला गेलेल्या जनावरांच्या कळपावर वाघाने शेतकर्यांच्या डोळ्यादेखत हल्ला चढविला. या हल्ल्यात एक गाय जागीच ठार झाली तर एक बैल एक गाय गंभीर जखमी झाले. यात शेतकर्यांचे जवळपास ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, मोहगांव येथील शेतकरी बाबाराव नागोजी पोहणकर हे दोन बैल, दोन गायी व एका गोर्हा जंगलात चरायला घेऊन गेले होते. दुपारी १ वाजताच्या सुमारास झुडपात दबा धरुन बसलेल्या वाघाने शेतकर्यांच्या नजरे समोर जनावरांच्या कळपावर हल्ला चढविला. यात एक गाय जागीच ठार झाली तर एक बैल एक गाय गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती सरपंच विलास नवघरे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांना देताच त्यांनी वनरक्षक कोंडबा गुंडप्पा, वनमजूर भाऊराव नागोसे यांनी गावकर्यांच्या मदतीने घटनास्थळी जाऊन तिन्ही जनावरांचा पंचनामा केला. डॉ. गिरी यांनी जखमी बैल व गायीवर प्राथमिक उपचार करीत मृत पावलेल्या जनावरांचे शवविच्छेदन केले. यामध्ये शेतकरी बाबाराव पोहणकर यांचे जवळपास ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. ऐन शेतीच्या हंगामात नुकसानीने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. नुकसानीची तातडीने भरपाई देण्याची मागणी सरपंच विलास नवघरे यांनी वनविभागाकडे केली आहे.