वर्धा : देवळी तालुक्यात डिगडोह रोडवरील पुराच्या पाण्यामुळे एका विद्यार्थ्यासह अन्य दोन जण असे तिघे जण अडकले होते. देवळी नगर परिषद व जिल्हा आपत्ती शोध व बचाव पथकाने या तिघांना सुरक्षितपणे बाहेर काढले. जवळपास तीन तासांच्या प्रयत्नांनी तिघांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
देवळी तालुक्यात २६ जून रोजी सकाळी जोरदार पाऊस झाला. डिगडोह येथील पुलाचे काम चालू असल्याने पुलाच्या बाजूला मातीचे बांध असल्यामुळे नदीच्या पाण्याच्या प्रवाहाला अटकावा निर्माण झाला. मातीचा बांध खसल्यामुळे एक शाळकरी विद्यार्थी हा पुलावरुन सायकलने जात असताना तसेच दोन नागरीक मोटार सायकलने जात असताना बांध फुटल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ झाली. त्यात शाळकरी विद्यार्थी व दोन नागरीक अडकले.
घटनेदरम्यान जिल्हा आपत्ती प्रतिसाद पथक, तालुका प्रशासन, अग्नीशामक दल नगर परिषद देवळी, पोलीस प्रशासनचे पथक सदर पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तीचा बचावा करीता तात्काळ उपस्थित झाले. जिल्हा आपत्ती प्रतिसाद पथक व अग्नीशामक दल नगर परिषद देवळीच्या पथकाने सदर पुरामध्ये अडकलेल्या दोन नागरीक व एक शाळकरी विद्यार्थी यांना पुराच्या पाण्यामधून सुखरुप बाहेर काढले.
दरम्यान ही माहिती मिळताच आमदार राजेश बकाने यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून बचावकार्य सुरू करण्याचे निर्देश दिले.घटनास्थळी तहसीलदार समर्थ क्षीरसागर, ठाणेदार अमोल मंडळकर उपस्थित होते.