ग्रामपंचायतीमध्ये होणार तीन जलमित्रांची नियुक्ती  file photo
वर्धा

ग्रामपंचायतीमध्ये होणार तीन जलमित्रांची नियुक्ती

करण शिंदे

वर्धा : जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी आता जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतसाठी गवंडी, मेकॅनिक फिटर व इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर अशा तीन नल जलमित्रांची नेमणूक करण्यात येणार आहे. याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी दिली. राज्य शिखर समितीच्या मान्यतेनुसार प्रति ग्रामपंचायतनुसार कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

बहुकौशल्य मॉडेलच्या अनुषंगाने निश्चित केलेल्या संचानुसार गवंडी, मेकॅनिक फिटर व इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर या तीन पदासाठी ग्रामपंचायत कडील कामाचा पूर्व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच ग्रामसेवकांनी प्रत्येक पदासाठी तीन उमेदवार यानुसार एकूण नऊ नल जलमित्रांची गुणवत्ता यादीनुसार विहित नमुन्यातील पत्र त्यांच्या फोटो व आधार कार्ड सह पंचायत समितीकडे सादर करावयाचे आहे. त्यानंतर त्यांची शासन स्तरावरून पूर्व चाचणी घेण्यात येणार आहे.त्यातून जलमित्रांच्या तीन पदासाठी एकेक उमेदवार निवडला जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान व पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल जाधव यांनी केले आहे.

पाणीपुरवठा योजनांच्या भविष्यातील देखभाल दुरुस्ती व शाश्वततेसाठी, ग्रामपंचायत स्तरावर तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता असणे आवश्यक आहे. यासाठी लोकसहभागाला अनन्य साधारण महत्व देण्यात आलेले आहे. पाणीपुरवठा योजनेच्या पूर्वनियोजन टप्प्यापासून ते देखभाल दुरुस्ती टप्प्यापर्यंत योजनेच्या भागधारकांचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय योजना टिकू शकत नाही. गाव पातळीवरील उपलब्ध असलेल्या अप्रशिक्षित, अर्धकुशल मनुष्यबळास कुशल प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT