वर्धा, पुढारी वृत्तसेवा : रामनवमीनिमित्त देवळी येथील श्रीराम मंदिरात दर्शनासाठी गेले असताना माजी खासदार रामदास तडस यांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारल्याचा प्रकार घडला. यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या घटनेने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
तडस यांनी याबद्दल बोलताना सांगितले की, ते दरवर्षी रामनवमीनिमित्त मंदिरात दर्शनासाठी येतात. मात्र यंदा मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश देण्यात आला नाही. त्यांना फक्त गर्भगृहाबाहेरूनच दर्शन घेण्यास सांगण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी शोभा तडस आणि भाजपाचे काही पदाधिकारी देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते.
घटनेबाबत श्रीराम मंदिर देवस्थान देवळीचे अध्यक्ष ओमप्रकाश आचार्य यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "मी घटनेच्या वेळी मंदिरात उपस्थित नव्हतो. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव सध्या कोणालाही गर्भगृहात प्रवेश दिला जात नाही. नेत्यांसोबत अनेक कार्यकर्ते असतात, त्यामुळे सुरक्षेचा विचारही महत्त्वाचा असतो."