वर्धा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा २० सप्टेंबर २०२४ रोजी वर्धा शहरातील स्वावलंबी मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमाचे सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करून प्रत्येकांनी आपल्या जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी, असे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात दौऱ्यासंबंधी आढावा घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन योग्य पध्दतीने करण्याची जबाबदारी प्रशासनाची असून यात कुठल्याही प्रकारची कमतरता राहता कामा नये असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची ने-आन करण्याची जबाबदारी, त्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था उत्तमरीत्या करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांची तसेच अन्य ठिकाणाहून येणाऱ्या कलावंताची कुठलीही गैरसोय होऊ नये याची दक्षता घेण्यात यावी. विश्वकर्मा योजनासह अन्य योजनांची माहिती देणारे दालन याठिकाणी असणार आहे. येथील व्यवस्था सुद्धा चोख ठेवण्यात यावी, असे त्या म्हणाल्या. लाभार्थी आणताना ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, लहान मुलं व दिव्यांग व्यक्तींना शक्य तो आणू नये असे सांगून आयुक्त म्हणाल्या की, पार्किंग पासून जास्त चालायला लागू नये, अशी व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी वैद्यकीय चमू तैनात ठेवण्यात यावी. कार्यक्रम संपल्यावर प्रत्येक लाभार्थी आले त्याच वाहनाने परत जातील व सुरक्षित जातील याची काळजी घ्यावी. यासाठी अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात यावी, असे सांगितले.
विश्वकर्मा योजनेचा राष्ट्रीय कार्यक्रम वर्धा येथे होत असून प्रशासनासाठी ही उत्तम संधी आहे. प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व केंद्र तथा राज्य सरकार मधील मंत्री व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सर्वांना साजेसा हा सोहळा होईल याची आपण सर्व काळजी घेऊ या असे त्यांनी सांगितले. कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा तीन दिवस प्रदर्शनी राहणार असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असेही त्यांनी सांगितले.