बीजिंग: पुढारी ऑनलाईन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चीनच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी चीनच्या युहान शहरातील धरणांचे कौतुक केले. जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा या धरणांबद्दल ऐकले होते. तुमच्या कार्यकौशल्याने तुम्ही ही धरणे बनवली आहेत. त्यामुळे त्यांचा अभ्यास करण्यासाठी मी चीनच्या दौऱ्यावर आलो आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
गेल्या वर्षी डोकलाम मुद्दावरुन दोन्ही देशात निर्माण झालेल्या वादानंतर पहिल्यांदाच मोदी चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत. दोन्ही पंतप्रधानांनी कोणतीही शंका मनात न बाळगता एकमेकांची भेट घेतली. खूप उत्साहाने एकमेकांशी हस्तांदोलन करत त्यांनी एकेमेकांशी गप्पाही मारल्या. चीनने मोदींचे स्वागत सांस्कृतिक कार्यक्रमाने केले.
गुजरातचा मुख्यमंत्री असताना मी या धरणांबद्दल ऐकले होते. तुम्ही या धरणांसाठी वापरलेले कौशल्य आणि गती पाहून मी प्रभावित झालो आहे. म्हणूनच मी या स्टडी टूरला आलो आहे. माझा एक दिवस मी या धरणांववर घालवणार आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.
भारत आणि चीन या दोन्ही देशांची संस्कृती नद्यांमुळे बांधली गेली आहे. हडप्पा आणि मोहनजोदडो यांचा विचार करता या दोन्ही संस्कृती नदीच्या किनारीच वसल्या होत्या, असेही पंतप्रधान म्हणाले.
नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांच्यात दोन्ही देशांबाबत विविध मुद्यावर चर्चा होणार असून, पुढील २४ तासात नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांच्यात सहा महत्त्वपूर्ण बैठका होणार आहेत. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये कोणताही करार होणार नाही.
चीनमध्ये जून महिन्यात शांघाय संगठन शिखर संमेलन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर होणारी मोदी-जिनपिंग बैठक महत्त्वाची आहे. भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. चीनच्या माध्यमांनी ही भेट म्हणजे एका नव्या युगाची सुरूवात असल्याचे म्हटले आहे.
Tags : India, China,PM Narendra Modi, Xi Jinping