वर्धा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘काळी दिवाळी’ धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे शेतकरी व कष्टक-यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले. खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान माजी राज्यमंत्री रणजित कांबळे, माजी राज्यमंत्री तथा शिवसेना उबाठाचे नेते अशोक शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, काँग्रेसचे नेते शेखर शेंडे, सुनील राऊत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, डॉ. अभ्युदय मेघेसह सुधीर पांगूळ यांनी मनोगत व्यक्त करीत सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर टीका केली.
नापिकी व कर्जबाजारीपणामुळे हवालदिल झालेल्या शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, ओल्या दुष्काळाच्या पॅकेजमध्ये वाढ करण्यात यावी, वर्धा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, वन्यजीवांकडून केल्या जात असलेल्या पिकांच्या नुकसानीच्या मदतीत वाढ करण्यात यावी, शेतक-यांना सोलर पंपाची सक्ती न करता सोलर व वीजजोडणी असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्यात यावे, शासकीय कामांची प्रलंबित देयके कंत्राटदारांना तातडीने अदा करण्यात यावी आदी मागण्यांकडे या आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले.
आंदोलनात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष कलावती वाकोडकर, काँग्रेसचे राजेंद्र शर्मा, बालू वानखेडे, दशरथ ठाकरे, अतुल पन्नासे, अर्चना भोमले, प्रवीण हिवरे, बाळकृष्ण माऊस्कर, रवी शेंडे, वीणा दाते, बाळा नांदुरकर, मुन्ना झाडे, महेश झोटिंग, राजाभाऊ पांगूळ, इक्राम हुसैन, किरण ठाकरे, निहाल पांडे, सलिम कुरेशी, संदीप किटे, रिपाइंचे विदर्भ प्रमुख महेंद्र मुनेश्वर, सुरेश ठाकरे, अरुणा धोटे यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.