Wardha Farmer Burns Soybean Crop :
वर्धा पुढारी प्रतिनिधी : पंकज गादगे
अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि रोगांमुळे सोयाबीन पीक हातचे गेल्याने वर्धा जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. समुद्रपूर तालुक्यातील उमरी येथील शेतकरी रुमदेव ठेंगणे यांनी हतबल होऊन आपल्या आठ एकर क्षेत्रावरील उभे सोयाबीन पीक पेटवून दिले. शासनाकडून मदत मिळत नसल्याने आणि नुकसानीमुळे शेतकरी हवालदील झाला होता, यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.
यावर्षी वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. अतिवृष्टीमुळे पिकाची वाढ खुंटलीच, पण त्याहून अधिक प्रादुर्भाव 'येलो मोझाईक' आणि 'चारकोल रॉट' या रोगांमुळे झाला आहे.
रुमदेव ठेंगणे यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक या रोगांमुळे काळं पडले, ज्यामुळे ते पूर्णपणे निकामी झाले. काळवंडलेल्या या पिकाला बाजारात कोणताही भाव मिळणार नाही, हे स्पष्ट होते. तसेच, उर्वरित पिकाची काढणी आणि मळणी (चोंगणी) करण्याचा खर्चही परवडणारा नसल्याने शेतकरी हवालदील झाले.
प्रारंभिक अंदाजानुसार, जिल्ह्यात २७,७७५ हेक्टरवरील सोयाबीन पीक प्रभावित झाले होते. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती अधिक बिकट असून, ५० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्याने आणि शासनाच्या मदतीची कोणतीही ठोस घोषणा न झाल्यामुळे निराश झालेल्या ठेंगणे यांनी आपल्या आठ एकर क्षेत्रावरील पीक जाळून टाकण्याचा कटू निर्णय घेतला. या घटनेत त्यांचे अंदाजे चार लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांची व्यथा सारखीच आहे. अन्य काही जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक संकटामुळे मदतीची घोषणा झाली असली तरी, वर्धा जिल्ह्याकडे सरकारने अद्याप लक्ष दिलेले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले असून, तात्काळ शासकीय मदत जाहीर करण्याची मागणी वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी करत आहेत. रुमदेव ठेंगणे यांच्या या कृतीने येथील शेतकऱ्यांची बिकट अवस्था आणि संकटातील आर्त हाक समोर आणली आहे.