

वर्धा : समुद्रपूर येथे रोख रकमेसह एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना रविवारी ५ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी सुमारे १३ लाख रुपयांसह ३ लाख रुपयांचे एटीएम मशीन असा १६ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रपूर येथे बँक ऑफ इंडिया शाखेच्याबाहेर ग्राहकांकरिता एटीएम मशीन बसविण्यात आली होती. रविवारी सकाळी काही नागरीक पैसे काढण्यासाठी गेले. त्यावेळी एटीएम मशीन जागेवरून गायब असल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच उपविभाग पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायर, ठाणेदार रविंद्र रेवतकर यांनी घटनास्थळ गाठून यासंबंधी चौकशी सुरू केली. पैशासह एटीएम मशीन चोरी गेल्याच्या घटनेची माहिती पसरताच सर्वत्र खळबळ उडाली आहे.
सदर एटीएममध्ये १३ लाख रुपयांवर रक्कम असल्याची माहिती कळते. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायर, ठाणेदार रवींद्र रेवतकर, गिरड ठाणेदार विकास गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक चेतन टेंभुर्णे, मोहतुरे आदींनी भेट देत पाहणी केली. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, ठसे तज्ज्ञ, डॉग स्कॉड पाचारण करण्यात आले होते. पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहेत.