Hinganghat police action
वर्धा : कंटेनरमधून जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करत २५ जनावरांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी कंटेनर, जनावरांसह ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिंगणघाट येथे ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरिता पोलीस स्टेशन हिंगणघाट परिसरात गस्त करत होते. त्यावेळी नागपूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरमध्ये जनावरे कोंबून त्यांची चाऱ्यापाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने भरून अवैधरित्या वाहतुक करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यावरून सापळा रचून हिंगणघाट येथील चौकात नाकाबंदी करताना जाम ते हिंगणघाट मार्गावर कंटेनर भरधाव वेगाने येताना दिसला.
पोलिसांनी कंटेनर मोठ्या शिताफिने थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये २५ जनावरे अवैधरित्या कोंबून चाऱ्या पाण्याची व्यवस्था न करता क्रूरतेने व निर्दयतेने वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी मस्तकिम इलियास खान (रा. ग्राम उदरी जि. शामली, उत्तर प्रदेश), अरमान इस्राइल खान (ग्राम दिंडुखेडा, जि. शामली उत्तर प्रदेश), शादाब इरफान कुरेशी (रा. ग्राम तावली, जि. मुजफ्फरनगर उत्तर प्रदेश), मुजफ्फर जफर पठाण, (ग्राम बूटराडा जि. शामली उत्तर प्रदेश), आदिल जफर पठाण (रा. ग्राम बूटराडा जि. शामली, उत्तर प्रदेश) या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. २५ जनावरे, कंटेनर असा ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पाचही जणांविरुद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जनावराना सुरक्षिततेकरीता व चारा पाण्याची व्यवस्थाकरीता वैद्यकीय तपासणी करून औदुंबर गोरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट रुई खैरीत. जिल्हा नागपूर गोशाळा येथे दाखल करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या निर्देशाप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक राहुल इटेकर, सहायक फौजदार मनोज धात्रक, पोलिस हवालदार अमर लाखे, अमरदीप पाटील, धर्मेंद्र अकाली. प्रमोद पिसे, महादेव सानप, विनोद कापसे, अरविंद इंगोले, रितेश कु-हाडकर , सुमेध शेंदरे, राहुल अदवाल, स्मिता महाजन यांनी केली.