Farming Importance
वर्धा : आपला देश कृषीप्रधान आहे. ग्रामीण भागातील ९० टक्के अर्थव्यवस्था आजही शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांना शेती करतांना अनेक टप्प्यांवर अडचणी येत आहे. अनेक वेळा नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. शासनसुध्दा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून प्रत्येक टप्प्यांवर मदत करीत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या स्व. सिंधुताई सपकाळ सभागृहामध्ये जिल्हा अग्रणी बँकेच्यावतीने आयोजित पीक कर्ज मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री डॉ. भोयर बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर कुश गणहोत्रा, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चेतन शिरभाते, संजय गाते यांच्यासह विविध बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
देशात, राज्यात व जिल्ह्यात शेतकरी अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असला तरच अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल. बँक व शेतकरी यांचा समन्वय असला पाहिजे. शेतकऱ्यांना सुलभ पध्दतीने कर्ज मिळावे, यासाठी तालुकानिहाय पिक कर्ज मेळावे घेण्यात येणार आहे. पीक कर्जापासून वंचित शेतकऱ्यांपर्यंत मेळाव्याची माहिती पोहचवावी. पिक कर्जासोबत इतरही कर्ज योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी यावेळी केले.
जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चेतन शिरभाते यांनी प्रास्ताविकात पिक कर्ज मेळावा आयोजनाबद्दलची भूमिका सांगितली. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून प्रत्येक तालुक्यावर पिक कर्ज मेळावा घेण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. घेतलेल्या पिक कर्जाची वेळेत परतफेड करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर कुश गणहोत्रा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात शेतकऱ्यांना पिक कर्ज मंजुरी प्रमाणपत्र देण्यात आले. सुरुवातीला मेळाव्यात आलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली व टोकन देण्यात आले. शेतकऱ्यांना सुलभ पिक कर्ज उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांचे अधिकारी, कर्मचारी यांनी बँकनिहाय स्टॉल लावले होते. पिक कर्जाची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जलदगतीने होण्यासाठी सेतू केंद्राची सुविधा सुध्दा उपलब्ध करुन देण्यात आली होती. शेतकऱ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी करुन १०४ शेतकऱ्यांना पिक कर्ज मंजूर करण्यात आले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्यंने उपस्थित होते.