बारा वर्षानंतर जिल्हा सहकारी बँकेतून पीक कर्ज वाटप  Pudhari Photo
वर्धा

वर्धा : बारा वर्षानंतर जिल्हा सहकारी बँकेतून पीक कर्ज वाटप

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

पुढारी वृत्तसेवा

वर्धा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुनरूज्जीवनाचे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. तब्बल बारा वर्षांच्या खंडानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक काही वर्षांपूर्वी बँक डबघाईस आली होती. बँकेचे पुनरूज्जीवन करण्यासाठी गठीत समितीने बँकेच्या प्रगतीकरिता पावले उचलण्यास सुरूवात केली आणि बँकेची वाटचाल पुढे होऊ लागली. बँकेने सुमारे १२ वर्षाच्या खंडानंतर जिल्ह्यात खरीप २०२४ या हंगामात शेतकर्‍यांना १७४ लाख इतक्या रक्कमेचे पीक कर्ज वाटप केले आहे.

शेतकर्‍यांची पीक कर्जाची मागणी विचारात घेऊन रब्बी २०२४ या हंगामात बँकेने प्रती शेतकरी ५० हजार रुपये या मर्यादेत वाढ करण्याची सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केली. बिगर शेती कर्जाच्या थकबाकी वसुलीसाठी संबंधीत थकबाकीदारांच्या मालमत्तेवर बँकेचा बोजा चढविण्यासाठी महसुल प्रशासनामार्फत बँकेस संपुर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी जिल्हाधिकारी यांनी ग्वाही दिली. एकंदरीत बँकेने जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत केलेल्या प्रगतीबाबत जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. ९ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सक्षमीकरण व पुनरुज्जीवन करण्याकरीता जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे.

सदर समितीची बैठक बँकेच्या मुख्यालयात घेण्यात आली. यावेळी अप्पर निबंधक तथा सहसचिव संतोष पाटील, बँकेचे प्रशासक तथा जिल्हा उपनिबंधक राजेंद्र कौसडीकर, सर्व सहाय्यक निबंधक, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे व बँकेचे सर्व शाखाधिकारी उपस्थिती होते. या बैठकीत बँकेची ३१ ऑगस्ट २०२४ अखेरची आर्थिक स्थिती, थकीत कर्जाची वसुली, खरीप पीक कर्ज वाटप, रब्बी पीक कर्जाचे नियोजन, बँकेच्या शाखांचे नुतनीकरण, बँकेचे संगणकीकरण इत्यादी विषयाचा आढावा घेण्यात आला. बँकेच्या देवळी येथील शाखेचे नुतनीकरण इवोनिथ कंपनीच्या सी. एस. आर. निधीतून करण्यात येणार असल्याबाबत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आर. के. शर्मा यांचा जिल्हाधिकारी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या कंपनीतर्फे बँकेच्या देवळी शाखेचे आगामी दोन महिन्यात नुतनीकरण पुर्ण करण्यात येणार आहे. बँकेच्या ठेव संकलनात तसेच सर्वाधिक बचत खाते उघडण्यात उत्कृष्ट काम केल्याबद्दल सचिन महाबुधे व मिनाक्षी धोपटे यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT