शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर लाभ योजनेतंर्गत ३८० शेतकर्‍यांना लाभ  Pudhari Photo
वर्धा

वर्धा : शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर लाभ योजनेतंर्गत ३८० शेतकर्‍यांना लाभ

पुढारी वृत्तसेवा

वर्धा : शासनाच्या वतीने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ज्या शेतकर्‍यांनी मागील महिन्यात आधार प्रमाणीकरण केले आहे, अशा जिल्ह्यातील ३८० शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर १ कोटी ८६ लाख रुपये रक्कम शासनामार्फत जमा करण्यात आली आहे. या योजनेत राज्यातील ११८३६ शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर ४६ कोटी ७० लाख रक्कम शासनामार्फत जमा करण्यात आली आहे. नियमित कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांकरिता शासनच्या वतीने योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत सन २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या तीन वर्षामध्ये कोणत्याही दोन वर्षात बँकेकडून पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेली आहे, अशा शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील १४ लाख ५० हजार शेतकर्‍यांना आजपर्यंत ५३१० कोटी रक्कमेचा लाभ देण्यात आला आहे.यामध्ये यवतमाळ जिल्हयातील ८२९ शेतकर्‍यांना ३५२ लाख, जळगांव जिल्हयातील ७२९ शेतकर्‍यांना ३०७ लाख, नाशिक जिल्हयातील ७१३ शेतकर्‍यांना रु. ३५४ लाख रक्कमेचा लाभ देण्यात आला आहे.

प्रोत्साहनपर लाभ योजनेतंर्गत ३३३५६ शेतकर्‍यांनी आधार प्रमाणीकरण केले नसल्याचे शासनाच्या ऑगस्ट २०२४ मध्ये निदर्शनास आले होते. त्यामुळे या शेतकर्‍यांना ५० हजार रुपयांपर्यतच्या प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळाला नव्हता. या शेतक-यांना आधार प्रमाणीकरणाची संधी १२ ऑगस्ट २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत देण्यात आली होती. या कालावधीत आधार प्रमाणीकरण केलेल्या ११८३६ शेतकर्‍यांच्या बँक खात्यात ४६.७० कोटीची प्रोत्साहनपर लाभाची रक्कम १ ऑक्टोबर २०२४ रोजी वर्ग करण्यात आली आहे. यात वर्धा जिल्ह्यातील ३८० शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर १ कोटी ८६ लाख रक्कम शासनामार्फत जमा करण्यात आली.जे शेतकरी आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वी मयत झाले आहेत अशा शेतकर्‍यांच्या वारसांची नावे योजनेच्या पोर्टलवर समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेनंतर आधार प्रमाणीकरण व योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT