वर्धा : दुचाकीवरून घरी जात असताना नॉयलॉन मांजाने गळा चिरल्याने रक्तस्त्राव होऊन शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि.६) सायंकाळी देवळी तालुक्यातील भिडी येथील राष्ट्रीय महामार्ग परिसरात घडली. सुभाष शेलूटे (वय ५०, रा. भिडी) असे मृताचे नाव आहे.
भिडी येथील शेतकरी सुभाष सेलूटे शेतातील फवारणीचे काम आटोपून दुचाकीने परतत होते. भिडी येथील महामार्ग परिसरात ते आले असता अचानक त्यांच्या गळ्याभोवती नॉयलॉन मांजा गुंडाळला गेला. मांजाने गळा चिरला गेल्याने रक्तस्ताव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. त्यानंतर देवळी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.