वर्धा: खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी आणि इतर पिकांच्या लागवडीसाठी खतांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासते. त्यामुळे खताचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी कृषी विभागाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत वर्धा जिल्ह्यात ७२ हजार मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे.
सध्या शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत व्यग्र आहेत. काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे मशागतीची कामे थांबली होती. मात्र, पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आता मशागत जोरात सुरू आहे. ट्रॅक्टर, बैलजोडी यांच्या साह्याने शेतात नांगरणी, सपाटीकरणाची कामे केली जात आहेत. लवकरात लवकर पेरणीसाठी शेततयारी सुरू आहे.
एकाच वेळी मोठ्या प्रमाणात मशागतीची कामे सुरू असल्यामुळे ट्रॅक्टरची मागणी वाढली आहे आणि काही शेतकऱ्यांना त्यासाठी अडचणींनाही सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे, खताच्या खरेदीसाठी देखील शेतकरी नियोजन करू लागले आहेत.
कपाशी, सोयाबीन, तूर यासारख्या पिकांना ठराविक टप्प्यांवर युरिया, मिश्र व संयुक्त खतांची आवश्यकता असते. खरीप हंगामात या खतांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. ही गरज लक्षात घेता कृषी विभागाने आधीच नियोजन केले असून ७२ हजार मेट्रिक टनांचा खतसाठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खताच्या टंचाईचा सामना करावा लागणार नाही, असा विश्वास कृषी प्रशासनाने व्यक्त केला आहे.